मुंबई: आयपीएलचा लिलाव काही दिवसांमध्येच होणार आहे. आज आयपीएलच्या लिलावातील खेळाडूंचे नामांकन करण्याची अखेरची तारीख होती. त्यामुळे आज आयपीएलमध्ये लिलाव होणाऱ्या खेळाडूंची यादी तयार करण्यात आली आहे. या लिलावात ८१३ भारतीय आणि २८३ परदेशी म्हणजेच एकूण १०९७ खेळाडूंचे नामांकन करण्यात आले आहे. या लिलावाच्या यादीत हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि एस. श्रीशांत आणि बऱ्याच अनुभवी भारतीय खेळाडूंच्या नावासह भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस २० लाख रुपये इतकी असणार आहे. १८ फेब्रुवारीला यंदाच्या आयपीएलसाठी लिलाव होणार आहे. यात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाईल. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात घेण्यासाठी कोण उत्सुकता दाखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केव्हा होणार सुरुवात आणि शेवट?
आयपीएल-२०२१ स्पर्धेला एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात होऊ शकते. ११ ते १४ एप्रिल दरम्यान स्पर्धेला सुरुवात होऊ शकते. तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा खेळविण्यात येईल. ६ जूनपर्यंत स्पर्धेचा अंतिम सामना होईल, असं म्हटलं जात आहे.
कोविडमुळे सुरक्षित वातावरणात आयपीएल स्पर्धा भारतात खेळविण्याची बीसीसीआयची तयारी नसताना वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा बीसीसीआयकडून केला जातोय, अशी टीका होत असल्यामुळे बीसीसीआयनंही आयपीएल स्पर्धा यशस्वीरित्या भारतात पार पाडण्यासाठी कंबर कसली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भारतातही खेळाडूंसाठी बायो-बबलचं नियोजन यशस्वीरित्या होऊ शकतं, असा दावा बीसीसीआयनं केला आहे.