चेन्नई : कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी यूएईमध्ये सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान आयपीएलचे आयोजन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आयपीएलचे बिगुल वाजू लागले आहेत. चेन्नईत गुरुवारी आयपीएलच्या १४व्या सत्रासाठी लिलाव होणार असून यावेळी एकूण २९२ क्रिकेटपटूंवर बोली लागेल. यामध्ये १६४ भारतीय, तर १२५ विदेशी खेळाडूंचा समावेश असून तीन असोसिएट खेळाडूंचाही यामध्ये समावेश आहे.ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, ऑस्ट्रेलियाचाच स्टार क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा अष्टपैली मोईन अली यांच्यावर अधिक बोली लागण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील आठ फ्रेंचाईजींना मिळून ६१ खेळाडूंची जागा भरायची आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) सर्वाधिक ११ खेळाडू निवडायचे आहेत. यासाठी त्यांच्याकडे ३५.४ कोटी रुपये असून सनरायझर्स हैदराबादला १०.७५ कोटी रुपयांमध्ये केवळ तीन खेळाडू निवडायचे आहेत.या लिलावामध्ये सर्वाधिक रक्कम किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे आहे. यंदा पंजाब किंग्ज या नव्या नावाने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या संघाकडे ५३.२० कोटी रुपये उपलब्ध असून त्यांना नऊ खेळाडू निवडायचे आहेत.
हे आहेत प्रमुख नियम १ प्रत्येक संघ आपल्या निर्धारित रकमेतून किंवा शिल्लक रकमेतूनच खेळाडूंना निवडू शकतात. आयपीएल संचालन परिषदेने ठरवल्यानुसार संघांच्या शिल्लक रकमेमध्ये कोणतीही वाढ होणार नाही.२ लिलावादरम्यान फ्रेंचाईजींकडे आरटीएम कार्ड म्हणजे ‘राइट टू मॅच’ कार्डचा पर्याय उपलब्ध नसेल. यंदा मिनी ऑक्शन होत असल्याने या कार्डचा पर्याय नसेल.३ प्रत्येक फ्रेंचाईजी आपल्या संघात जास्तीत जास्त २५ खेळाडूंना स्थान देऊ शकतील. तसेच प्रत्येक फ्रेंचाईजीला संघात किमान १८ खेळाडू ठेवावे लागतील. म्हणजेच प्रत्येक फ्रेंचाईजीमध्ये किमान १८ आणि जास्तीत जास्त २५ खेळाडू असतील.४ प्रत्येक फ्रेंचाईजी आपल्या संघात कमीत कमी १७ आणि जास्तीत जास्त २५ भारतीय खेळाडू ठेवू शकतील. यामध्ये कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश करु शकता. आपल्या निवडीप्रमाणे फ्रेंचाईजी संघ बनवू शकतात.५ प्रत्येक फ्रेंचाईजी आपल्या संघात जास्तीत जास्त आठ विदेशी खेळाडू निवडू शकतात. त्याचप्रमाणे, अंतिम संघात मात्र जास्तीत जास्त चार विदेशी खेळाडूंना खेळविण्याची मुभा आहे. त्याचवेळी, अंतिम संघातील विदेशी खेळाडूंची किमान संख्या मात्र निर्धारीत नाही. म्हणजेच फ्रेंचाईजी पूर्ण भारतीय खेळाडूंचा अंतिम संघही खेळवू शकतात.
यांच्यावर आहे नजर...यंदाची आयपीएल भारतामध्ये आयोजित करण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच भारतातील संथ आणि फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टी पाहून मॅक्सवेल आणि मोईन अली या अष्टपैलू खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. मॅक्सवेलचा स्पर्धेतील रेकॉर्ड फारसा चांगला नसून त्याने ८२ सामन्यांत २२ च्या सरासरीने १५०५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन स्टार स्टीव्ह स्मिथही सर्वाधिक भाव खाण्याची शक्यता आहे. मॅक्सवेल आणि स्मिथ दोघांची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचवेळी, सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल असलेला इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान याच्यावरही अनेकांची नजर असेल. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता मॅक्सवेल, स्मिथ यांच्याऐवजी मलानला अधिक पसंती देण्याची शक्यता आहे.
या भारतीयांकडे असेल लक्षलिलावामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या केवळ तीन भारतीय खेळाडूंवर बोली लागेल. यामध्ये केदार जाधव, अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून केदारला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, वाढते वय पाहता अनुभवी हरभजनला कितपत पसंती मिळते हेही पहावे लागेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उमेशची कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे त्याच्यावर फार मोठी बोली लागण्याची शक्यता दिसत नाही.
सीएसकेपुढे आव्हानचेन्नई सुपरकिंग्ज संघापुढे यंदा नवे आव्हान असेल. यंदाच्या लिलाव प्रक्रियेतून त्यांना नव्याने आपला संघ उभारायचा आहे. गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये सीएसके संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्यातच, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जाहीरपणे युवा खेळाडूंवर अविश्वासही दाखवला होता. सीएसकेने अनुभवाला अधिक प्राधान्य देताना ट्रेडिंग विंडोदरम्यान त्यांनी राजस्थान रॉयल्सकडून रॉबिन उथप्पाला आपल्या संघात घेतले. त्यामुळेच या लिलावामध्ये सीएसके कोणत्या खेळाडूंसाठी बोली लावणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आता ‘पंजाब किंग्ज’आगामी आयपीएल सत्रात किंग्ज ईलेव्हन पंजाब नव्या नावाने आणि नव्या लोगोसहीत उतरेल. चेन्नईत होणाºया लिलावापूर्वी या संघाने आपले नवे नाव ‘पंजाब किंग्ज’ असे जाहीर केले. त्याचप्रमाणे, बुधवारी पंजाब किंग्जच्या नव्या लोगोचेही अनावरण करण्यात आले. संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेनन यांनी सांगितले की, ‘पंजाब किंग्ज एक अधिक विकसित ब्रँड नेम आहे. ही वेळ आमच्या मुख्य ब्रँडकडे अधिक लक्ष देण्यास योग्य असल्याचे आम्हाला वाटते. २००८ सालच्या पहिल्या सत्रापासून आयपीएलमध्ये खेळत असलेल्या या संघाला अद्याप एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही.
युवा ठरणार ‘महागडे’अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेले काही खेळाडू (अनकॅप्ड) या बोलीमध्ये चांगलेच भाव खाऊन जातील. यामध्ये आघाडीवर आहे तो केरळचा सलामीवीर मोहम्मद अझरुद्दिन. त्याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत आपल्या तडाखेबंद फटकेबाजीने सर्वांनाच प्रभावित केले. याशिवाय तामिळनाडूचा शाहरुख खान, अष्टपैलू सोनू यादव, बडोद्याचा विष्णू सोलंकी आणि बंगालचा आकाश दीप यांचा समावेश आहे. या सर्वांची मूळ किंमत २० लाख रुपये इतकी आहे.
काय होणार ज्युनिअर तेंडुलकरचे?मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन या लिलावामध्ये आकर्षण ठरणार आहे. यंदा त्याने मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतून मुंबईच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केले. अर्जुनला २० लाख रुपयांच्या मूळ किंमती वर्गात ठेवण्यात आले आहे. त्याने काही स्थानिक स्पर्धांमध्ये आपल्या अष्टपैलू खेळाने प्रभावित केले असून नेट प्रॅक्टिसमध्येही त्याने अनेक आंतरराष्ट्रीय फलंदाजांना आपल्या वेगवान गोलंदाजीने चकीत केले. मुंबई इंडियन्स त्याच्यासाठी जोरदार प्रयत्न करेल अशी चर्चा आहे.
सर्वाधिक कांगारु!या लिलवामध्ये ऑस्ट्रेलिया चे सर्वाधिक ३५ खेळाडूंचा समावेश आहे. त्यानंतर न्यूझीलंड (२०), वेस्ट इंडिज (१९), इंग्लंड (१७), दक्षिण आफ्रिका (१४) आणि श्रीलंका (९) यांचा समावेश आहे. यासोबतच अफगाणिस्तान (७), बांगलादेश (४) आणि अमेरिका, यूएई व नेपाळ येथील प्रत्येकी एका खेळाडूचाही समावेश आहे.