IPL 2021, Mumbai Indians: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघानं राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात ७ विकेट्सनं विजय प्राप्त केला. गेल्या काही सामन्यांपासून मुंबई इंडियन्सची रुळावरुन घसरलेली गाडी आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रुळावर आल्याचं पाहायला मिळालं. राजस्थाननं दिलेलं १७२ धावांच आव्हान मुंबई इंडियन्सनं ७ विकेट्स राखून पूर्ण केलं आणि शानदार विजय प्राप्त केला.
मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातोच पण मैदानातील हटके मनोरंजनासाठी वेस्ट इंडिजचे खेळाडू सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. असाच काहीसा प्रसंग आजच्या सामन्यात घडला. पोलार्ड त्याच्या खणखणीत फटकेबाजीनं चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवताना आपण अनेकदा पाहिलं असेल पण आज पोलार्डच्या हेल्मेटनं चौकार लगावल्याचा हटके प्रकार पाहायला मिळाला.
विराट, डीव्हिलियर्सनं मन जिंकलं! दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या चिमुकल्यासाठी केला खास Video
त्याचं झालं असं की, मुंबई इंडियन्सच्या डावाच्या १८ व्या षटकात ख्रिस मॉरिसनं कायरन पोलार्डला शॉर्ट पिच बाऊन्सर चेंडू टाकला. चेंडू सोडून देण्यासाठी पोलार्ड खाली वाकला आणि चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळून हवेत उडाला. नुसता उडाला नाही तर थेट सीमारेषेच्या दिशेनं जाऊ लागला. पोलार्डला काय घडलं ते नेमकं सुरुवातीला कळलं नाही. मग चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जात असल्याचं पोलार्डनं पाहिलं आणि चेंडूला उद्देशून त्यानं सीमेरेषेच्या दिशेनं जाण्याचे हातवारे करू लागला. पोलार्डच्या विनोदबुद्धीनं गोलंदाज ख्रिस मॉरिसच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. पोलार्डनं मग मॉरिसला हस्तांदोलन करुन खेळभावनेचा सन्मान केला.
दरम्यान, आजच्या सामन्यात कायरन पोलार्डनं ८ चेंडूत नाबाद १६ धावांची खेळी साकारली. यात एक उत्तुंग षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे.
पाहा व्हिडिओ: