दुबई : ‘टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड न झाल्याने माझे खेळावरील लक्ष विचलित झाले नाही. मी याबाबत फार विचार करत नसून संघात निवड होणे, हे माझ्या हातात नाही’, असे आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने सांगितले.
हर्षल म्हणाला की, ‘संघात निवड न झाल्याची मला कोणतीही खंत नाही. मी कायम माझ्यापरीने योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. संघ निवडीबाबत सांगायचे झाल्यास हा निर्णय माझ्या हातात नाही. मी कोणत्याही संघातून खेळताना केवळ सर्वोत्तम खेळ करण्यावर लक्ष देतो. हेच माझे लक्ष्य असून, जोपर्यंत क्रिकेट खेळत राहीन तोपर्यंत मला माझा सर्वोत्तम खेळ करायचा आहे.’
मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षलने शानदार हॅटट्रिक घेतली. याविषयी तो म्हणाला की, ‘मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हॅटट्रिक घेतली. मी कधी शालेय क्रिकेटमध्येही हॅटट्रिक घेतली नव्हती. आयपीएलमध्ये सहाव्यांदा हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहोचलो होतो आणि पहिल्यांदा हॅटट्रिक घेतली.