IPL 2021, CSK: आयपीएलच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांचं नाव एकत्रच घेतलं जातं. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच धोनी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्सवर २०१६ आणि १७ साली बंदी घालण्यात आली होती. पण २०१८ साली संघानं पुनरागमन करत स्पर्धेचं तिसरं विजेतेपद पटकावलं होतं. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतलं जातं. गेल्या सीझनमध्ये चेन्नईची कामगिरी निराशाजनक राहिली आणि धोनीच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. धोनी व्यक्तिरिक्त इतर खेळाडूला संघाचं नेतृत्व देण्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. पण संघ कितीही कठीण परिस्थितीचा सामना करत असला तरी धोनीच संघाच्या नेतृत्वपदी कायम का राहणार? याचा खुलासा संघाचे मालक एन.श्रीनिवासन यांनी केला आहे.
धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी एकूण १९७ सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. यात ११९ सामन्यांत धोनीच्या नेतृत्वात संघाला विजय प्राप्त करता आला आहे. तर ७६ सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. धोनीच्याच नेतृत्वात सीएसके संघानं तब्बल ८ वेळा आयपीएलच्या फायलनमध्ये प्रवेश केला आहे. तर गेल्या वर्षीचा मोसम वगळता इतर सर्व मोसमावत चेन्नईचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचला आहे.
श्रीनिवासन यांच्याकडून धोनीवर स्तुतीसुमनं"आयपीएल जिंकणं सर्वांसाठी महत्वाचं आहे. पण त्यात सातत्य आणि निष्ठा देखील महत्वाची गोष्ट आहे. गेल्या ५० वर्षांपासून मी क्रिकेटशी जोडलो गेलेलो आहे. अनेक संघांना मी जवळून पाहिलं आहे. तामिळनाडूचा रणजी संघ देखील आमच्या सोबत जोडला गेला आहे. क्रिकेटवर प्रेम करणारे लोक आमच्यासोबत जोडले गेले आहेत", असं श्रीनिवासन म्हणाले. ते 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
"चेन्नई संघासाठी प्रत्येक सामना जिंकण्याची धोनीची प्रबळ इच्छाशक्ती असते. त्याला जे आवडतं ते तो करतो आणि तो एक असा व्यक्ती आहे की जो क्रिकेटकडे अतिशय गांभीर्यानं बघतो. त्यामुळेच इतका मोठा खेळाडू असूनही त्यानं यंदाच्या आयपीएलसाठी याआधीच सरावाला सुरुवात देखील केली आहे. धोनीसारखं नेतृत्व संघाला मिळतंय हे संघातील प्रत्येक खेळाडूचं आणि पर्यायानं चाहत्यांचं नशीब आहे", असं श्रीनिवासन यांनी सांगितलं.
आयपीएलचा गेला मोसम चेन्नई संघासाठी निराशाजनक राहिला. चेन्नईचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचला नाही असं पहिल्यांदाच गेल्या वर्षी घडलं. त्यावेळी धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं सांगितलं जात होतं. पण या सर्व चर्चा धोनीनं फेटाळून लावल्या होत्या.