IPL 2021: आयपीएलचं यंदाचं सीझन कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्यानंतर आता स्पर्धेशी निगडीत बेटिंगची प्रकरणं उघडकीस येऊ लागली आहेत. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील एका सफाई कर्मचाऱ्याला आयपीएल बुकीला सामन्याचे 'बॉल टू बॉल' अपडेट दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी या घटनेचा खुलासा केला आहे. (ipl 2021 bookies employed cleaner to pass on match information during one IPL game)
इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलरकडून RRचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला खास भेट; Pic Viral
आयपीएल बेटिंगसाठीची नवी मोडस ऑपरेंडी यावेळी उघड झाली. आयपीएलचा सामना सुरू असताना ग्राऊंडवरील सफाई कर्मचारी सामन्याचे फोनवरुन संबंधित बुकीला 'बॉल टू बॉल' लाइव्ह अपडेट्स द्यायचा. स्टेडियमवर सुरू असलेला सामना आणि टेलिव्हिजन वाहिनीवर होणारं लाइव्ह टेलिकास्ट यात काही सेकंदांचा फरक असतो. याचाच फायदा उचलून आयपीएल बेटिंग केलं जात असल्याचं उघड झालं आहे.
IPL 2021: चेन्नई सुपरकिंग्ज संघात कोरोनाचा विस्फोट! फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांना लागण
"बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकातील एका सदस्यानं संबंधित सफाई कर्मचाऱ्याला रंगेहाथ पडकलं. पण त्यानं तिथून पळ काढला. त्याचे दोन मोबाइल मात्र तिथंच टाकून पळाला होता. ते दिल्ली पोलिसांकडे देण्यात आले आहेत", अशी माहिती शब्बीर हुसेन यांनी दिली. अशाच आणखी एका प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केल्याचीही माहिती हुसे यांनी दिली आहे. पोलिसांनी २ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामन्याचे खोटे अॅक्रेडेशन पास देखील जप्त केले आहेत.
"दोन वेगवेगळ्या दिवशी खोट्या पासच्या जोरावर दिल्लीच्या स्टेडियममध्ये प्रवेश मिळविण्यात त्यांना यश आलं होतं. रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला पळून जाण्यात यश आलं असलं तरी त्याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. त्याचं आधारकार्ड, फोटो आणि इतर कागदपत्र पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून त्याच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील", असंही हुसेन यांनी सांगितलं.
नेमकं कसं पकडलं?स्टेडियमचा सफाई कर्मचारी सामना दिसेल अशा एका ठिकाणी उभा होता. त्याचवेळी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकातील एका अधिकाऱ्यानं त्याला पाहिलं. तो फोनवर बोलत होता. अधिकाऱ्यानं याबाबत विचारलं असता कर्मचाऱ्यानं मी माझ्या प्रेयसीसोबत फोनवर बोलत आहे, असं सांगितलं. अधिकाऱ्यानं त्याचा मोबाइल घेऊन रिसेंट कॉन्टॅक्ट लिस्ट तपासण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संबंधित कर्मचाऱ्यानं तिथून पळ काढला. विशेष म्हणजे त्याच्या गळ्यात स्टेडियममध्ये उपस्थित राहण्यासाठीचा अॅक्रेडेशन पास देखील होता. क्लास-४ चा पास त्याच्या गळ्यात होता की जो बस ड्रायव्हर, क्लिनर आणि इतर कर्मचारी वर्गाला देण्यात येतो.