IPL 2021, Cheteshwar Pujara: 'डॅडी'ज आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघात यंदा आणखी एक वयाची तिशी ओलांडलेला खेळाडू सामील झाला आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात चेन्नई सुपरकिंग्ज संघानं चेतेश्वर पुजाराला संघात घेऊन सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. आता चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर पुजारानंही टी-२० जोशात सरावाला सुरुवात केली आहे.
चेतेश्वर पुजाराचा एक नेट प्रॅक्टीस व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आयपीएल लिलावात चेन्नईच्या संघानं चेतेश्वर पुजाराला अवघ्या ५० लाखांच्या बोलीवर संघात दाखल करुन घेतलं आहे. पुजारा तब्बल ७ वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे आणि त्यासाठी त्यानं जोरदार तयारीला सुरुवात केलीय. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणं आपल्यासाठी भावनिक क्षण असल्याचं पुजारानं याआधी म्हटलं होतं. धोनीच्याच नेतृत्वाखाली पुजाराचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं होतं.
पुजाराचा व्हिडिओ व्हायरलचेन्नईचा संघ सध्या मुंबईत असून नेट्समध्ये जोरदार सराव करतो आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ३३ वर्षीय पुजारा नेट्समध्ये षटकारांचा सराव करताना व्हिडिओत दिसतो आहे. पुजारा वेगवान गोलंदाज दिपक चहरच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटच्या दिशेनं मोठा फटका लगावताना दिसला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर फिरकीपटू कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर स्लॉग स्वीप माराताना दिसतो. यासोबतच पुजारा लाँग ऑनच्या दिशेने चौकार आणि पॅडवर येणाऱ्या चेंडूला फ्लिक करताना पाहायला मिळतो आहे. व्हिडिओच्या शेवटी पुजारा एक्स्ट्रा कव्हर्समध्ये खणखणीत फटका मारताना दिसतो.
"एक टी-२० क्रिकेटपटू म्हणून मी स्वत:ला कुठे पाहतो हे मला माहित नाही. पण एक क्रिकेटपटू म्हणून मी निश्चितच चांगल्या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बराच काळ खेळल्याचा अनुभव गाठीशी असल्यानं टी-२० सारख्या लहान फॉरमॅटमध्येही चांगली कामगिरी करू शकेन असा मला विश्वास आहे. आयपीएलमध्ये मी सध्या एकदम योग्य ठिकाणी आहे. संघ, कर्णधार आणि सपोर्टिंग स्टाफ अशा सर्वच गोष्टी माझ्यासाठी चांगल्या आहेत. माझी कामगिरी चांगली व्हावी यासाठी मदत करणारे खूप जण संघात आहेत", असं पुजारा म्हणाला.