मुंबई : कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पाचवेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स यंदा आयपीएलमध्ये जेतेपदाचा ‘षट्कार’ मारेल, असा विश्वास या संघाचा फिरकीपटू राहुल चाहर याने मंगळवारी व्यक्त केला.२१ वर्षांचा लेग स्पिनर राहुलने २०१७ च्या पर्वात पुणे सुपरजायंट्स संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यावेळी केवळ तीन सामने खेळायला मिळाले, २०१८ ला मुंबई संघाने त्याला एक कोटी ९० लाखांत स्वत:कडे घेतले. तेव्हापासूनच मुंबईच्या अंतिम एकादशचा अविभाज्य भाग बनला. मागच्या पर्वात राहुलने १५ सामन्यांत १५ गडी बाद केले होते. २०१३, २०१५, २०१७ ,२०१९ आणि २०२० असे एकूण पाचपैकी मागच्या दोन पर्वात संघाच्या जेतेपदात राहुलचे योगदान राहिले. येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या १४ व्या पर्वात रोहितच्या नेतृत्वात पुन्हा विजेते होऊ, असा विश्वास राहुलने व्यक्त केला आहे. राहुल हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्न याला रोल मॉडेल मानतो. पदार्पणात त्याने इम्रान ताहिरकडून टिप्स घेतल्या होत्या. अंडर १९ संघातून इंग्लंड दौऱ्यावर गेला त्यावेळी देखील ताहिरची त्याला मदत लाभली होती.बालपणापासून क्रिकेटवेडा असलेल्या राहुलने १६ व्या वर्षी राजस्थानकडून प्रथमश्रेणी सामन्यात पदार्पण केले. आतापर्यंत १७ प्रथमश्रेणी सामन्यात ६९ गडी बाद केले असून, ३५३ धावा काढल्या आहेत. आयपीएलच्या ३१ सामन्यांत त्याचे ३० बळी आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2021: रोहितच्या नेतृत्वात जेतेपदाचा षटकार ठोकू- राहुल चाहर
IPL 2021: रोहितच्या नेतृत्वात जेतेपदाचा षटकार ठोकू- राहुल चाहर
मुंबई इंडियन्सच्या फिरकी गोलंदाजाला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 4:22 AM