दुबई : यूएईत होणाऱ्या आयपीएलच्या ३१ सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश मिळू शकतो. अमिरात क्रिकेट बोर्ड किमान ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याची शक्यता आहे. त्यासाठी लस घेण्याची अट अनिवार्य करण्यात आली आहे. बीसीसीआय अधिकारी या संदर्भात लवकरच अमिरात बोर्डासोबत चर्चा करणार असून सामन्यांच्या तारखा १८-१९ सप्टेंबर ते ९-१० ऑक्टोबर अशा असतील.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आज मंगळवारी येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह हे दाखल झाले असून बीसीसीआयच्यावतीने आगामी टी-२० विश्वचषक आयोजनासाठी भारतातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्याची विनंती करणार आहेत.
-७००-८०० जणांना यूएईत देणार लस
बीसीसीआयची अमिरात बोर्डासोबत लवकरच बैठक होणार आहे. त्यात आयपीएलमध्ये सहभागी होणारे अन्य खेळाडू आणि सपोर्ट स्टफ यांना लस देण्यावर चर्चा होईल. इंग्लंड दौरा करणाऱ्या भारतीय खेळाडूंनी पहिला डोस भारतात घेतला. सर्वांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये दिला जाईल. त्यानंतर विराट आणि सहकारी खेळाडू यूएईत दाखल होतील. अन्य खेळाडू आणि स्टाफ यांना यूएईत लस दिली जाईल, असे शुक्ला यांनी सांगितले. दोन डोसमध्ये २-३ महिन्यांचे अंतर असावे, असा भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचा निकष असल्याने लसीकरणासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल, असे शुक्ला म्हणाले.
यूएईत ७० टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. लस घेतली नसल्यास अन्य देशांच्या नागरिकांना येथे प्रवेश दिला जात नाही. २१ दिवसांच्या कालावधीत सात दिवस प्रत्येकी एक साखळी सामना, दहा डबल हेडर व नंतर दोन क्वालिफायर, एक एलिमिनेटर तसेच फायनल असे चार प्ले ऑफ सामने होतील. त्यासाठी यूएईतील सर्व प्रोटोकॉल पाळले जातील, अशी हमी देखील शुक्ला यांनी दिली.
‘खलीज टाईम्स’शी बोलताना राजीव शुक्ला म्हणाले,‘प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याचा निर्णय यूएई सरकार आणि ईसीबीवर अवलंबून असेल. त्यांचा निर्णय बंधनकारक राहील. प्रेक्षकांची अनुपस्थिती आमच्यासाठी चिंतेची बाब नाही.’ - राजीव शुक्ला
Web Title: IPL 2021 could see vaccinated fans cheering from stands up to 50% stadium capacity
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.