IPL 2021, Chennai Super Kings beat Delhi Capitals in Qualifier 1 and enter Final : चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) क्वालिफायर १ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) ४ विकेट्स राखून विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) ६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून नाबाद १८ धावा करताना चेन्नईला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. धोनीच्या मॅच फिनिशर इनिंगनंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) केलेल्या ट्विटनं सोशल मीडियावर कल्ला केला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्ससाठी पृथ्वी शॉ यानं ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. त्यानंतर हेटमायर व रिषभ यांची दमदार खेळ केला. शिमरोन हेटमारनं ३७ धावा केल्या आणि रिषभ पंत ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला अन् दिल्लीनं ५ बाद १७२ धावा केल्या. फॅफ ड्यू प्लेसिस ( १) अपयशी ठरल्यानंतर ऋतुराज गायकवाड व रॉबीन उथप्प यांनी दमदार खेळ केला. सुरेश रैनाच्या जागी संधी मिळालेल्या रॉबीननं धडाकेबाज खेळी करताना दिल्लीच्या गोलंदाजांना धारेवर धरले. त्यानं ऋतुराजसह दुसऱ्या विकेटसाठी ११० धावा जोडल्या.
रॉबीननं ४४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारासह ६३ धावा केल्या. CSK ला अखेरच्या पाच षटकांत ५२ धावांची गरज असताना मोईन अली व ऋतुराज ही जोडी खेळपट्टीवर होती. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलनं अप्रतिम झेल घेत ऋतुराजला माघारी पाठवले. ऋतुराजनं ५० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ७० धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी आला अन् दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचला. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावा हव्या होत्या. टॉम कुरनच्या षटकात धोनीनं तीन खणखणीत चौकार खेचले. चेन्नईनं ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं लगेच ट्विट केलं. त्यानं लिहिलं, किंग परतलाय... सर्वोत्तम फिनिशर... आज पुन्हा एकदा सोफ्यावर उड्या मारण्यास मला भाग पाडले.