दुबई : मोठे सामने खेळण्याचा बराच अनुभव असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सकडे (Chennai Super Kings)आज, रविवारी आयपीएल-१४च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये (Qualifier 1 IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi capitals) विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. दिल्ली संघ २० गुणांसह अव्वल असून, कामगिरीतही सातत्य राखले आहे. चेन्नईने मागच्या वर्षीची दारुण कामगिरी मागे टाकून यंदा पुन्हा प्लेऑफमध्ये धडक दिली. १२ पैकी ११ वेळा प्लेऑफ गाठण्याचा या संघाने मान संपादन केला.
साखळीत मात्र अखेरचे तीनही सामने गमावल्याचे शल्य कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला निश्चितपणे असेल. दिल्लीला देखील काल अखेरचा साखळी सामना आरसीबीविरुद्ध गमवावा लागला. पराभवाचा वाटचालीवर फारसा परिणाम झाला नसला तरी खेळाडूंचा आत्मविश्वास डळमळीत झाला असावा. चेन्नईने आठवेळा अंतिम फेरी गाठली. त्यात तीनदा जेतेपद पटकाविले. यावरून हा संघ गरजेनुसार सर्वोत्कृष्ट कामगिरीवर विश्वास बाळगतो, हे सिद्ध होते. हा संघ आपल्या अनुभवी खेळाडूंवर विश्वास राखत असल्याने सामन्यात फारसे बदल करीत नाही. ऋतुराज गायकवाड हा मात्र अपवाद आहे.
गोलंदाजी दिल्लीची ताकद
दिल्लीची भक्कम बाजू त्यांची गोलंदाजी आहे. अवेश खान (२२ बळी), अक्षर पटेल (१५ बळी), कॅगिसो रबाडा (१३ बळी) आणि एन्रिच नोर्खिया(९ बळी) यांनी आपापली भूमिका चोखपणे पार पाडली.
दिल्लीने साखळीत दहा सामने जिंकले; पण फलंदाज ओळीने उपयुक्त ठरले नाहीत. पृथ्वी शॉ ४०१, शिखर धवन ५४४ यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज टप्प्याटप्प्यात कामगिरी करताना दिसले. कर्णधार ऋषभ पंत ३६२ हा काहीवेळा उपयुक्त ठरला. मार्कस् स्टोयनिस जखमी असल्याने संघ संतुलन साधण्यास त्रास होतो.
धोनीचा सिद्धांत...
धोनीच्या मते, ‘जे आजमावले ते अनुभवी. त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा.’ याच कारणास्तव अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, आणि फाफ डुप्लेसिस यांच्यासारखे चेहरे आणि जोश हेजलवूड व मोईन अली या आंतरराष्ट्रीय अनुभवी खेळाडूंना तो पसंती देतो. संयोजन कसे असावे याची त्याला जाणीव आहे. धोनी स्वत: फॉर्ममध्ये नाही. १४ सामन्यांत त्याच्या केवळ ९६, तर रैनाच्या १२ सामन्यांत १६० धावा आहेत. गायकवाडने ५३३, डुप्लेसिस ५४६, जडेजा २२७ यांनी संघाला तारले. शार्दुल ठाकूरने १८, तर ड्वेन ब्राव्होने १२ गडी बाद केले आहेत.
Web Title: IPL 2021, CSK vs DC: Delhi capitals or Chennai Super Kings! Who will be the glue? Fighting between experienced and young players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.