दुबई : चेन्नई सुपर किंग्जने अखेरच्या षटकांत दिल्लीवर चार गड्यांनी विजय मिळवला. दिल्लीच्या पृथ्वी शॉ याच्या वेगवान खेळीपेक्षा चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड याची ७० धावांची खेळी भारी पडली. दिल्लीने सीएसकेसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान चेन्नईने १९.४ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सुपर विजयासह चेन्नईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. सीएसके नवव्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचला आहे. सलग गडी बाद झाल्यानंतर चेन्नईचा विजय कठीण वाटत असताना कर्णधार महेंद्र सिंह धोनी मैदानात आला. त्याने आल्या आल्या आवेश खानला षटकार लगावला. त्यानंतर अखेरच्या षटकांत टॉम कर्रन याला दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार लगावले. त्यामुळे त्याच्यावर दबाव वाढला आणि त्याची लय बिघडली. त्याने वाईड बॉल टाकला. त्याच्या पुढच्या चेंडूवर धोनीने चौकार लगावत चेन्नईला नवव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचवले.तत्पूर्वी चेन्नईने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले होते.
दिल्लीने पृथ्वी शॉ (७० धावा) आणि ऋषभ पंत (५१ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५ बाद १७२ धावा केल्या. त्यानंतर चेन्नईची सुरुवात मात्र अडखळती झाली. पहिल्याच षटकांत नॉर्खियाने फाफ डु प्लेसीसला बाद केले. मात्र त्यानंतर ऋतुराज आणि रॉबिन उथप्पा यांनी १०० धावांची भागीदारी केली. उथप्पाने ४४ चेंडूत ६३ तर गायकवाड याने ५० चेंडूत ७० धावा केल्या.