- सुनील गावसकर
गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांवर येण्याचा लाभ हाच की या संघात होणाऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळते. याच कारणास्तव पात्र ठरलेले संघ कुठलीही शिथिलता न बाळगता पहिल्या दोन स्थानी येण्यासाठी मैदानावर सर्वोत्कृष्ट योगदान देतात. अनेकदा तर अव्वल दोन आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ धावगतीच्या आधारे निश्चित होतात. याच कारणास्तव सर्व संघ दमदार एकादश खेळविण्यावर भर देतात. यंदा दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघ गुणांबाबत समान स्थितीत होते, पण धावगतीत बंगलोर आणि केकेआरने मुंबईवर बाजी मारली. चांगले कर्णधार आणि कोच अशी परिस्थिती आणि शक्यता नेहमीच डोक्यात ठेवतात. (Chennai Super Kings lost the last few matches. The time of defeat came when the experienced players did not perform as expected. When the team takes to the field against Delhi capitals, it will be a matter of great concern)
साखळीत अखेरच्या सामन्यात पराभव पत्करलेल्या दोन संघात पहिला सामना क्वालिफायर खेळला जाईल. त्यामुळे हे संघ लय गमावतील का हे पाहणे उत्सुकतेचे असेल. चेन्नईने मागचे काही सामने गमावले. अनुभवी खेळाडूंनी अपेक्षेनुरुप कामगिरी न केल्यामुळे पराभवाची वेळ आली. दिल्लीविरुद्ध हा संघ मैदानावर उतरेल त्यावेळी ही बाब धाकधूक वाढविणारी ठरेल.
दिल्ली आणि बंगलोर हे संघ फॉर्ममध्ये आहेत. दिल्लीला बंगलोरकडून अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला, पण संघाकडे धावा काढणारे आणि बळी घेणारे खेळाडू आहेत. यामुळे पराभवाचा त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. ऋषभ पंत हा सकारात्मक आणि भविष्याबाबत विचार करणारा खेळाडू आहे. लक्ष्याचा बचाव करायचा झाल्यास अखेरच्या दोन षटकांसाठी सर्वोत्तम गोलंदाज असायलाच हवे हे त्याने आत्मसात केले असावे. एन्रिच नोर्खिया आणि कॅगिसो रबाडा या दोन अनुभवी गोलंदाजांना अखेरची दोन षटके देता आली असती. आवेश हा युवा गोलंदाज असून त्याच्याकडे वेग आहे, पण कठिण स्थितीत द. आफ्रिकेचे अनुभवी गोलंदाज अधिक उत्कृष्ट ठरू शकले असते. (टीसीएम)
अनुभवाबाबत बोलायचे झाल्यास चेन्नई संघ सुरेश रैनाचा विचार करीत असेल. रैना मॅचविनर आहे. गेल्या काही वर्षांत त्याला वेगवान माऱ्यापुढे संघर्ष करावा लागला हे खरे आहे. पण त्याच्यात सामन्याचे चित्र पालटण्याची ताकद आहे. एन्रिच नोर्खिया, कॅगिसो रबाडा आणि आवेश खान हे त्याची परीक्षा घेतील. तरीही रैनाबाबत संधी घेत फायनलचा मार्ग प्रशस्त होत असेल तर त्यात वाईट काहीच नाही. दिल्लीने यंदा चेन्नईवर दोनदा विजय मिळविला. मग चेन्नई तिसऱ्यांदा ‘लकी’ ठरेल?