IPL 2021, CSK vs KKR, Live: कोलकाता नाइट रायडर्स संघानं (Kolkata Knight Riders) चेन्नई सुपर किंग्जसमोर (Chennai Super Kings) विजयासाठी १७२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीनं याही सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवत ३३ चेंडूत ४५ धावांची खेळी साकारली. यात १ षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. तर नितीश राणानं २७ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी साकारली. अखेरच्या दोन षटकांमध्ये दिनेश कार्तिकनं विस्फोटक फलंदाजी केली. कार्तिकनं ११ चेंडूत २६ धावा केल्या. यात एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. चेन्नईकडून शार्दुल ठाकूर यानं ४ षटकांमध्ये २० धावा देत दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. तर फॅफ ड्यू प्लेसिसनं लाँग ऑनवर इयॉन मॉर्गनचा टिपलेला अप्रतिम झेल डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला.
सामन्याची नाणेफेक जिंकून कोलकातानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकाताची सुरुवात यावेळी थोडी निराशाजनक झाली. पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शुबमन गिल धावचित झाला. चेन्नईच्या अंबाती रायुडूनं डायरेक्ट हिट करत शुबमनला तंबूत धाडलं. त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी धावसंख्येला आकार देण्यास सुरुवातच केली होती. त्यात सामन्याच्या ६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यर (१८) याला शार्दुल ठाकूरनं माघारी धाडलं. यष्टीरक्षक धोनीनं अय्यरचा झेल टिपला. इयॉन मॉर्गन याही सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. मॉर्गन(८) मोठा फटका मारण्याच्या नादात लाँग ऑनवर फॅफ ड्यू प्लेसिसला झेल देऊन बसला. धोनीचा हुकमी हक्का रवींद्र जडेजानं मैदानात जम बसवलेल्या राहुल त्रिपाठीला (४५) माघारी धाडलं. तर 'लॉर्ड' शार्दुल ठाकूर यानं केकेआरच्या विस्फोटक आंद्र रसेल(२०) याला बाद केलं. रसेलनं १५ चेंडूत २० धावा केल्या.