चेन्नई सुपर किंग्सनं थरराक सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर २ विकेट्स राखून विजय मिळवला अन् गुणतक्त्यात १६ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली. KKRनं ठेवलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना CSKच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर रवींद्र जडेजानं तुफान फटकेबाजी केली. त्यानं ८ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २२ धावा कुटल्या.
अखेरच्या षटकात चार धावांची गरज असताना सुनील नरीननं सॅम कुरन व जडेजा या दोन महत्त्वाच्या विकेट्स टिपल्या. त्यानंतर एका चेंडूत एक धाव असा सामना चुरशीचा झाला. दीपक चहरनं विजयी धाव घेतली. फॅफ ड्यू प्लेसिस ( ४४), ऋतुराज गायकवाड ( ४०) व मोइन अली ( ३२) यांनी दमदार कामगिरी केली. KKRकडून राहुल त्रिपाठीनं ३३ चेंडूंत ४५ धावा केल्या आणि दीनेश कार्तिकनं ११ चेंडूंत २६ व नितीश राणानं ३७ धावा केल्या.
या सामन्यानंतर १ विकेट व ८ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. त्यानं आजच्या Daughter's day च्या निमित्तानं हा पुरस्कार लेक निध्यानाला समर्पित केला.