दुबई : गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला गुरुवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज विरोधात खेळायचे आहे. या सामन्यात सीएसकेचा संघ विजयाचा दावेदार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील या संघाचे पारडे सलग दोन सामन्यांतील पराभवानंतरही पंजाबवर भारी दिसून येत आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीतून पंजाब बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. गेल्यावर्षी खराब खेळाला विसरून यावर्षी शानदार पुनरागमन करणाऱ्या चेन्नईने यूएईतील फेरीत चांगला खेळ केला. आहे. त्यांना येथे पराभूत करणे सोपे नाही.
चेन्नईचे फलंदाज आणि विशेषतः ऋतुराज गायकवाड हा लयीत आहे. चेन्नईचे फलंदाज या खेळाला कायम ठेवण्यास उत्सुक आहेत. गायकवाड आणि दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फाफ डुप्लेसीसने आघाडीच्या क्रमात चांगला खेळ केला. तर, अंबाती रायुडू हा मधल्या फळीत उपयुक्त ठरला आहे. मोईन अली याने गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, सुरेश रैना आणि धोनी यांचा खराब फॉर्म हा चेन्नईच्या चिंतेचा विषय आहे.
जडेजाने एक अष्टपैलू म्हणून चांगली कामगिरी केली आहे. तर, राजस्थान रॉयल्स विरोधातील सामन्यात चेन्नईचे गोलंदाज चांगली कामगिरी करू शकले नव्हते. त्यांना या स्पर्धेत आपल्या खेळात तातडीने बदल करावे लागतील. दीपक चहर याने आतापर्यंत १२ बळी घेतले आहे. तर, काही प्रसंगी संघाला चांगली सुरुवात करून दिली. शार्दूल ठाकूर याच्या नावावर १५ बळी आहेत. त्याला त्याचा हा फॉर्म कायम राखावा लागेल. जोश हेजलवूड आणि ड्वेन ब्रावोने आपल्या कौशल्याचा नमुना सर्वांसमोर दाखवला आहे. तर जडेजा प्रत्येक भूमिकेत उपयुक्त ठरला. पंजाबच्या संघाला सातत्यपूर्ण खेळ करता आलेला नाही. आत्तापर्यंत राहुलने ५२८ आणि मयांकने ४२९ धावा केल्या आहेत. गोलंदाजी शमी (१८ बळी) आणि अर्शदीप (१६ बळी) हे चमकले आहेत. मात्र प्ले-ऑफमध्ये पोहोचणे त्यांच्यासाठी कठीण आहे.