IPL 2021, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्स ( PBKS) अखेरच्या साखळी सामन्याच अचानक फॉर्मात आला. लोकेश राहुलनं ( KL Rahul) एकहाती चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) लोळवलं. आता पंजाबच्या खात्यात १२ गुण झाले आहेत आणि प्ले ऑफ प्रवेशासाठी त्यांना कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या दारूण पराभवाची प्रतीक्षा करावी लागेल. ते सहज शक्य नक्कीच नाही.
ऋतुराज गायकवाड ( १२) चुकीचा फटका मारून अर्षदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मोईन अली ( ०), सुरेश रैना ( २) व अंबाती रायुडू ( ४) हे झटपट माघारी परतले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आजतरी खेळेल असे वाटले होते, परंतु रवी बिश्नोईनं ( Ravi Bishnoi) त्याला पुन्हा त्रिफळाचीत केले. धोनी १२ धावांवर बाद झाल्यामुळे चेन्नईची अवस्था ५ बाद ६१ अशी झाली होती. फॅफ ड्यू प्लेसिस दुसऱ्या बाजून संयमी खेळ करताना CSKसाठी आशादायक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यानं ४६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. फॅफला ६व्या विकेटसाठी रवींद्र जडेजाची साथ मिळाली. फॅफनं ५५ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७६ धावा केल्या. चेन्नईनं ६ बाद १३४ धावा केल्या.
चेन्नईच्या फलंदाजांची अवस्था पाहता पंजाबलाही धक्के बसतील असे वाटले होते. पण, लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी ४.३ षटकांत ४६ धावा जोडल्या. CSKच्या शार्दूल ठाकूरनं एकाच षटकात दोन धक्के देताना पंजाबला बॅकफूटवर फेकले. त्यानं मयांक ( १२) व सर्फराज खान ( ०) यांना माघारी पाठवले. लोकेश मात्र चेन्नईच्या गोलंदाजांना जुमानत नव्हता. खणखणती षटकात व सुरेख पदलालित्य वापरून त्यानं मारलेले चौकार, CSKच्या चेहऱ्यावर निराशा पसरवत होते. पंजाबनं १३ षटकांत ४ बाद १३९ धावा करताना सामना जिंकला. लोकेश ४२ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह ९८ धावांवर नाबाद राहिला.