Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली अन् रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाचे ग्रह फिरले. विराटच्या घोषणेनंतर काहीसा गोंधळलेला व भावनिक झालेल्या RCBच्या खेळाडूंना काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. त्यामुळेच त्यांना विजय हुकलावणी देत आहे. IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यातील सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना हार मानावी लागली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) आणखी एक विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलेच अन् प्ले ऑफच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकले.
विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीवर ऋतुराज गायकवाडनं उपस्थित केली शंका?, चढला कॅप्टनचा पारा, Video
फक्त चांगली सुरुवात करून दिली म्हणजे मोठी धावसंख्या उभारली असं होतं नाही. त्यासाठी मधल्या फळीतील फलंदाजांचेही योगदान महत्त्वाचे असते. हिच गोष्ट आज RCB विसरली. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडून दिल्या. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ( CSK) RCBच्या फलंदाजांची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. पहिल्या १० षटकांत ९० धावा करूनही RCBला १५६ धावांपर्यंतच मजल मारता आली, म्हणजे अखेरच्या १० षटकांत त्यांनी फक्त ६६ धावा केल्या आणि त्यात ६ विकेट्स गमावल्या.
विराट-देवदत्तची १११ धावांची भागादीर ड्वेन ब्राव्होनं मोडली. विराट ४१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांवर रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. महेंद्रसिंग धोनीनं इथूनच सामना फिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर शार्दूल ठाकूरनं सलग दोन चेंडूंत विकेट घेत RCBवरील दडपण वाढवलं. शार्दूलनं १७व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर एबी डिव्हिलियर्स ( १२) व देवदत्त यांना बाद केले. देवदत्त ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ७० धावा करून माघारी परतला. दीपक चहरनं पदार्पणवीर टीम डेव्हिडला माघारी पाठवले. ड्वेन ब्राव्होनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि धोनीचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवला.
प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKलाही चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये बिनबाद ५९ धावा जोडल्या. या आयपीएलमधील CSKची ही पॉवर प्लेमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. ९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चहलनं CSKला धक्का दिला. विराटनं अफलातून झेल टिपून ऋतुराजला ३८ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर फॅफही ( ३१) मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. CSKचे दोन्ही सलामीवीर ७१ धावांवर मागे परतूनही RCBला सामन्यावर पकड घेता आली नाही. मोईन अली व अंबाती रायुडू यांनी चांगला खेळ केला. पण, हर्षल पटेलनं ही जोडी तोडली व अली २३ धावांवर झेलबाद झाला.
RCBनं विकेट मिळवल्या, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तरीही हर्षल पटेलनं १६व्या षटकात अंबाती रायुडूची ( ३१) विकेट घेत सामन्यातील चुरस वाढवण्याचा प्रयत्न केला. CSKला विजयासाठी २२ चेंडूंत २२ धावांची गरज असताना सुरेश रैना व महेंद्रसिंग धोनी ही दोस्तांची जोडी मैदानावर होती. त्यांना विजय मिळवून देण्यात फार संघर्ष करावा लागला नाही. CSKनं ६ विकेट्स राखून विजय मिळवताना १४ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली.