Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटॉर बनवण्याचा निर्णय का घेतला, याचे उत्तर आजच्या सामन्यात मिळाले असेल. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेत धोनीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ( RCB) मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली. विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) गोलंदाजांचा समाचार घेताना १११ धावा जोडल्या, पण धोनी शांत होता. तो संधीची वाट पाहत होता अन् अखेरच्या १० षटकांत RCBनं त्याला ती दिली. ड्वेन ब्राव्हो व शार्दूल ठाकूर यांनी बाजी पलटवली अन् सामन्यानंतर विराटनंही ती चूक मान्य केली.
RCBचे ग्रह फिरले, चेन्नईनं सहज विजय मिळवून अव्वल स्थान गाठले!
IPL 2021, CSK vs RCB Match Highlights:
- विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या षटकापासून आक्रमक खेळ केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडून विक्रमाची नोंद केली. CSKविरुद्ध RCBच्या खेळाडूंनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. पण, पहिल्या १० षटकांत सुसाट पळालेली RCBची गाडी दुसऱ्या टप्प्यात अडखळली अन् त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
- विराट व देवदत्तनं RCBला अपेक्षित सुरुवात करून दिली. या दोघांनी चेन्नईविरुद्ध RCBकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी केली. विराट-देवदत्तची १११ धावांची भागादीर ड्वेन ब्राव्होनं मोडली. विराट ४१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांवर रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पहिल्या १० षटकांत बिनबाद ९० धावा करणाऱ्या RCBला पुढील ५ षटकांत २८ धावा करता आल्या. विराटच्या विकेटनंतर त्यांचा खेळ अधिक मंदावला.
- महेंद्रसिंग धोनीनं इथूनच सामना फिरवण्यास सुरुवात केली. त्यानं चतुराईनं ड्वेन ब्राव्होला आणलं अन् विराटची विकेट मिळवली. त्यानंतर शार्दूलनं सलग दोन चेंडूंत विकेट घेत RCBवरील दडपण वाढवलं. शार्दूलनं १७व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर एबी डिव्हिलियर्स ( १२) व देवदत्त यांना बाद केले. देवदत्त ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ७० धावा करून माघारी परतला.
- दीपक चहरनं पदार्पणवीर टीम डेव्हिडला माघारी पाठवले. बंगलोरला अखेरच्या १० षटकांत ६६ धावा करता आल्या आणि त्यांनी ६ फलंदाज गमावले. ड्वेन ब्राव्होनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि धोनीचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवला.
- प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKलाही चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये बिनबाद ५९ धावा जोडल्या. या आयपीएलमधील CSKची ही पॉवर प्लेमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. ९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चहलनं CSKला धक्का दिला. विराटनं अफलातून झेल टिपून ऋतुराजला ३८ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर फॅफही ( ३१) मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
- CSKचे दोन्ही सलामीवीर ७१ धावांवर मागे परतूनही RCBला सामन्यावर पकड घेता आली नाही. मोईन अली व अंबाती रायुडू यांनी चांगला खेळ केला. पण, हर्षल पटेलनं ही जोडी तोडली व अली २३ धावांवर झेलबाद झाला. RCBनं विकेट मिळवल्या, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तरीही हर्षल पटेलनं १६व्या षटकात अंबाती रायुडूची ( ३१) विकेट घेत सामन्यातील चुरस वाढवण्याचा प्रयत्न केला.
- CSKला विजयासाठी २२ चेंडूंत २२ धावांची गरज असताना सुरेश रैना व महेंद्रसिंग धोनी ही दोस्तांची जोडी मैदानावर होती. त्यांना विजय मिळवून देण्यात फार संघर्ष करावा लागला नाही. विराटला त्याच्या गोलंदाजांची साथ मिळाली नाही. वनिंदू हसरंगानं सर्वाधिक ४० धावा दिल्या.