IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. ऋतुराज गायकवाडनं ( Ruturaj Gaikwad) अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून आयपीएलमधील त्याचे पहिले शतक झळकावले. CSKनं उभ्या केलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात RR दडपणाखाली जाईल, असे वाटत होते. कारण त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखण्यासाठी हा सामना जिंकमे महत्त्वाचे होते. या दडपणातही त्यांच्याकडून जबरदस्त खेळ झाला. CSKकडून ऋतुराज व रवींद्र जडेजा भिडले आणि त्यांना RRच्या शिवम दुबे ( Shivam Dube) व यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) या 'मुंबई'कर फलंदाजांनी चोख प्रत्युत्तर दिले.
फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी पुन्हा एकदा CSKला चांगली सुरुवात करून दिली. फॅफनं काही अप्रतिम फटके मारले. राहुल टेवाटियाच्या गोलंदाजीवर फॅफ ( २५) बाद झाला. सुरेश रैनाला आज बढती मिळाली, परंतु त्यालाही ( ३) टेवाटियानं बाद केलं. अर्धशतकानंतर ऋतुराजनं धावांचा वेग वाढवताना टेवाटियाला सलग दोन खणखणीत षटकार खेचले. पण, त्याच षटकात मोईन अलीला आणखी धावा चोपण्याची हाव महागात पडली. अली २१ धावांवर यष्टिचीत झाला. पण, ऋतुराजची भूक काही शमली नाही, त्यानं फटकेबाजी सुरूच ठेवली.ऋतुराजनं ६० चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह नाबाद १०१ धावा चोपल्या, तर जडेजानं १५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३२ धावा कुटल्या. चेन्नईनं ४ बाद १८९ धावा केल्या.
१८वं षटक संपलं तेव्हा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) ९३ धावांवर नाबाद होता. १२ चेंडूंत तो सहज ७ धावा करून शतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण, रवींद्र जडेजा भलत्याच मूडमध्ये होता. त्या १२पैकी १० चेंडू जडेजानं खेळून काढली आणि त्यानं १५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ३२ धावा केल्या. ९५ धावांवर असताना ऋतुराजला २०व्या षटकाची दोन चेंडू मिळाले. पण, त्यातही मुस्ताफिजूर रहमाननं पाचवा चेंडू बाऊन्सर फेकला. पण, ऋतुराजनं अखेरचा चेंडू ९८ मीटर लांब भिरकावून शतक पूर्ण केलं.
राजस्थान रॉयल्सकडून CSKला सडेतोड उत्तर मिळाले. एव्हीन लुईस आणि यशस्वी जैस्वाल यांनी ५.२ षटकांत ७७ धावा कुटून RRला दमदार सुरूवात करून दिली. शार्दूल ठाकूरनं सहाव्या षटकात लुईसला ( २७ धावा, १२ चेंडू, २/४, २/६) बाद केले. पण, यशस्वी सुसाट खेळला. त्यानं १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधली अनकॅप खेळाडूनं केलेलं हे दुसरं जलद अर्धशतक ठरलं. २०१८मध्ये इशान किशननं KKRविरुद्ध १७ चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं. राजस्थान रॉयल्सकडूनही हे दुसरं जलद अर्धशतक ठरलं, २०१८मध्येच जोस बटलरनं दिल्लीविरुद्ध १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या KM Asif यानं त्याची विकेट घेतली. यशस्वीनं २१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ५० धावा केल्या.
यशस्वीनं RRला मिळवून दिलेला वेग कर्णधार संजू सॅमसन व शिवम दुबे यांनी कायम राखताना १०च्या सरासरीनं धावा कुटल्या. आयपीएल २०२१च्या यूएई टप्प्यात पहिलाच सामना खेळणाऱ्या शिवमनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. RRकडून असे प्रत्युत्तर मिळेल याचा अंदाज CSKनंही बांधला नसावा. १६व्या षटकात शार्दूल ठाकूरनं ही भागीदारी तोडली. संजू सॅमसन २८ धावांवर माघारी परतला. पण, सामना RRच्या तराजूत आलाच होता आता फक्त विजयाची औपचारिकता पूर्ण करायची होती. RRनं ७ विकेट्स व १५ चेंडू राखून ही मॅच जिंकली. शिवम ४२ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार मारून ६४ धावांवर नाबाद राहिला.