IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK)च्या १९२ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) सुरुवात दणक्यात केली, परंतु ११व्या षटकात शार्दूल ठाकूरनं सामना फिरवला. CSKनं IPL 2021 Final मध्ये KKRवर २७ धावांनी विजय मिळवताना चौथं जेतेपद नावावर केलं. बिनबाद ९१ वरून कोलकाताचे ९ फलंदाज ७४ धावांत माघारी परतले. तरीही या जेतेपदासाठी KKR खऱे पात्र असल्याचे मत महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) व्यक्त केलं.
ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराज ( ३२), रॉबीन उथप्पा (१५ चेंडूंत ३ षटकारांसह ३१ धावा), मोईन अली (३७) आणि . फॅफनं ( ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं ३ बाद १९२ धावा केल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात शुबमन गिल ( ५१) व वेंकटेश अय्यर ( ५०) यांनी ९१ धावांची सलामी दिली. ११व्या षटकात KKRच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूरनं ११व्या षटकात वेंकटेश ( ५०) व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर कोलकातानं विकेट्सची रांग लावली. सुनील नरीन ( २), गिल (५१), इयॉन मॉर्गन ( ४), दिनेश कार्तिक (९), शाकिब अल हसन (०), राहुल त्रिपाठी ( २) हे अपयशी ठरले. दीपक चहरनं ३१ धावांत १, रवींद्र जडेजानं ३७ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडनंही दोन, तर शार्दूरनं ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
महेंद्रसिंग धोनी काय म्हणाला?
चेन्नईच्या विजयाबद्दल बोलण्याआधी मी कोलकाता नाइट रायडर्सबद्दल बोलेन. इथपर्यंत मजल मारणे हे त्यांच्यासाठी दमदार पुनरागमनासारखेच होते आणि ही गोष्ट अत्यंत आव्हानात्मक होती. यंदाच्या आयपीएलमध्ये जेतेपदासाठी कोण खरं पात्र असेल तर तो कोलकाताचा संघ. याचे श्रेय हे प्रशिक्षक, संघ आणि सपोर्ट् स्टाफला द्यायला हवं. मधल्या काळात मिळालेला ब्रेक अत्यंत फायदेशीर ठरला. CSKबद्दल सांगायचे तर आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करत एकामागून एक विजय मिळवले. प्रत्येक फायनल ही स्पेशल असते. तुम्ही आकडेवारी पाहाल, तर फायनलमध्ये सर्वाधिक पराभवाचा विक्रम आमच्या नावावर आहे. पण, मागच्या पर्वातील अपयशानंतरचा हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे महेंद्रसिंग धोनी म्हणाला.
Web Title: IPL 2021, CSK Won 4th Title : MS Dhoni "First I should talk about KKR not about CSK, if any team who deserves to win the title that was KKR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.