इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) जेतेपद पटकावले. कोलकाता नाइट रायडर्सला ( KKR) १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ बाद १६५ धावा करता आल्या. CSKनं हा सामना २७ धावांनी जिंकून चौथ्यांदा आयपीएल जेतेपद नावावर केले. फॅफ ड्यू प्लेसिसला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं. फॅफनं या सामन्यात ८६ धावांची खेळी केली होती. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली. KKRचा फलंदाज राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) जेव्हा बाद होऊन माघारी जात होता, तेव्हा धोनीनं त्याची पाठ थोपटली आणि यामागचं कारण समजल्यावर Thala बद्दलचा आदर आणखी वाढला.
चेन्नईच्या फलंदाजी दरम्यात सातव्या षटकात राहुल त्रिपाठीच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आणि त्याला मैदान सोडावे लागले. तो फलंदाजीला येण्याचीही शक्यता कमी होती. पण, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला न येता, आठव्या क्रमांकावर आला. पायाला दुखापत झाली असतानाही राहुल फलंदाजीला आला आणि त्यानं आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण, अवघ्या दोन धावा करून त्याला माघारी जावं लागलं. राहुलचे हे समर्पण पाहून धोनीही खूश झाला आणि त्यानं त्याची पाठ थोपटली.
सामन्याचा निकाल काय लागला?ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराज ( ३२), रॉबीन उथप्पा (१५ चेंडूंत ३ षटकारांसह ३१ धावा), मोईन अली (३७) आणि . फॅफनं ( ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईनं ३ बाद १९२ धावा केल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात शुबमन गिल ( ५१) व वेंकटेश अय्यर ( ५०) यांनी ९१ धावांची सलामी दिली. ११व्या षटकात KKRच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूरनं ११व्या षटकात वेंकटेश ( ५०) व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर कोलकातानं विकेट्सची रांग लावली. सुनील नरीन ( २), गिल (५१), इयॉन मॉर्गन ( ४), दिनेश कार्तिक (९), शाकिब अल हसन (०), राहुल त्रिपाठी ( २) हे अपयशी ठरले. दीपक चहरनं ३१ धावांत १, रवींद्र जडेजानं ३७ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडनंही दोन, तर शार्दूरनं ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.