IPL 2021, DC vs SRH, Highlights: निराशाजनक कामगिरीमुळे थेट कर्णधार बदलला, इतकंच नव्हे तर त्याला संघाबाहेरही बसवलं अन् अनेक प्रयोग करुन पाहिले तरी संघ गुणतालिकेत तळाशीच राहिला. आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात संघाबाहेर बसवलेल्या वॉर्नरला पुन्हा संघात स्थान दिलं तरी पुन्हा 'पहिले पाढे पंचावन्न' अशी केविलवाणी अवस्था सनरायझर्स हैदराबादची झाली आहे. दुसरीकडे गेल्या सीझनपासून अभिमान वाटावा अशा जबरदस्त बदलानं नव्या दमानं दिल्ली कॅपिटल्सचा संघ कामगिरी करताना पाहायला मिळतोय. याही सीझनमध्ये संघ १४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचलाय. दिल्लीनं आजच्या सामन्यात हैदराबादला १३ चेंडू आणि ८ गडी शिल्लक ठेवून पराभूत केलं.
IPL 2021, DC vs SRH, Highlights:
- आयपीएलचं जेतेपद नावावर असलेला हैदराबादचा संघ पहिल्या टप्प्यातील निराशाजनक कामगिरीला मागे सारून दुसऱ्या टप्प्यात नव्या दमानं उतरलेला पाहायला मिळेल अशी आशा होती. पण तसं काहीच पाहायला मिळालं नाही. हैदराबादचा दिल्ली विरुद्ध लाजीरवाणा पराभव झाला. खरंतर सामन्याच्या नाणेफेकीचा काैल हैदराबादच्या बाजून लागला होता. कर्णधार केन विल्यमसननं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हैदराबादच्या संघात आयपीएलमध्ये खोऱ्यानं धावा करणाऱ्या विस्फोटक डेव्हिड वॉर्नरचं पुनरागमन झालं होतं. त्यामुळे आज दिल्लीच्या गोलंदाजांची वॉर्नर स्टाइल धुलाई होईल अशी आशा होती. पण घडलं उलटंच. दिल्लीच्या ताफ्यातील दोन दक्षिण आफ्रिकी वेगवान गोलंदाजांनी कहर केला.
- कगिसो रबाडा आणि एन्रीच नॉर्खिया यांनी जबरदस्त वेगानं हैदराबादी फलंदाजांवर मारा सुरू ठेवत धावसंख्येला वेसण घातली. त्यात आवेश खान यानंही साथ देत हैदराबादच्या नाकी नऊ आणले. नॉर्खियानं सामन्याच्या पहिल्याच षटकात १५०.१ इतक्या गतीनं चेंडू टाकत आपला मनसुबा स्पष्ट केला होता.
- पहिल्याच षटकात एन्रीच नॉर्खियानं घातक डेव्हिड वॉर्नरला शून्यावर बाद केलं आणि हैदराबादला तिथच जमिनीवर आणलं. त्यानंतर रबाडानं वायु वेगानं गोलंदाजी करत हैदराबादच्या फलंदाजांना रोखून धरलं. हैदराबादच्या फलंदाजांना मोकळा श्वास घ्यायलाच जागा द्यायची नाही असं जणू दिल्लीच्या गोलंदाजांनी ठरवलं होतं असं चित्र पाहायला मिळालं.
- कगिसो रबाडानं तीन, तर नॉर्खियानं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर फिरकीपटू अक्षर पटेल यानंही आपल्या फिरकीची जादू दाखवत दोन बळी घेतले. वृद्धीमान सहा आणि केन विल्यमसन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण चांगली भागीदारी रचण्यात अपयश आलं. हैदराबादकडून आज एकाही फलंदाजाला वैयक्तिक ३० धावांचा आकडा देखील गाठता आला नाही.
अब्दुल समद यानं सर्वाधिक २८ धावा केल्या. तर राशिद खान यानं २२ धावांचं योगदान दिलं. केन विल्यमसन आणि वृद्धीमान सहा यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या. हैदराबादचा डाव २० षटकांच्या अखेरीस ९ बाद १३४ वर संपुष्टात आला आणि स्पर्धेत तुफान फॉर्मात असलेल्या दिल्लीपुढं कमकुवत आव्हानासह क्षेत्ररक्षणासाठी उतरण्याची नामुष्की हैदराबादवर ओढावली.
दिल्लीच्या सलामीवीरांनी आपल्या लौकिकाला साजेशी सुरुवात करत संघावर अजिबात दबाव निर्माण होऊ दिला नाही. धवन-शॉनं आपल्या 'ओल्ड स्कूल' अंदाजात फटकेबाजीस सुरुवात केली. त्यात खलील अहमदच्या गोलंदाजीवर शॉनं अनियंत्रित फटका खेळला आणि विल्यमसन यानं डिप मिड विकेटच्या दिशेनं धाव घेत अप्रतिम झेल टिपला. सामन्याच्या तिसऱ्या षटकात दिल्लीला पहिला धक्का बसला होता.
पृथ्वी शॉला बाद केल्यानंतर सामन्यात पुनरागमन करण्याची संधी हैदराबादला होती. पण दुखापतीवर मात करुन मैदानात परतलेल्या श्रेयस अय्यरचा इरादा स्पष्ट होता. त्यानं आपल्या दिमाखदार शैलीतील फटक्यांची आतषबाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. राशीद खाननं शिखर धवनला बाद केलं खरं पण तोवर बराच उशीर झाला होता. धवन, श्रेयस यांनी अर्धशतकी भागीदारी रचली होती.
धवन बाद झाल्यानंतर कर्णधार रिषभ पंत मैदानात आला आणि श्रेयस अय्यरला उत्तम साथ देत धावांची गती कायम ठेवली. विकेट पडल्याचा कोणताही दबाव रिषभनं संघावर निर्माण होऊ दिला नाही. मैदानावर जम बसवलेल्या श्रेयस अय्यरला खुलून फलंदाजी करण्यासाठी याचा फायदा झाला. सामन्याच्या १८ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शानदार षटकार खेचून अय्यर दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.