मुंबई (IPL 2021) : आयपीएल म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. तडाखेबंद फटकेबाजीचा अनुभव घेण्यास अवघ्या काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. मात्र, टी-२० क्रिकेटमध्ये धुवांधार फटकेबाजी म्हणजे विजय, असे काही ठरलेले नसते. यासाठी सांघिक कामगिरी महत्त्वाची असते. त्यामुळेच तर आयपीएलमध्ये असे काही संघ आहेत, ज्यांच्या फलंदाजांनी तब्बल दहाहून अधिकवेळा वैयक्तिक शतके झळकावली. परंतु, तरीही या संघांना एकदाही जेतेपदाला गवसणी घालता आली नाही.
आतापर्यंत आयपीएल इतिहासात तीन संघांनी दहा किंवा त्याहून अधिक वैयक्तिक शतके ठोकली. मात्र, या तिन्ही संघांना आतापर्यंत जेतेपदाने हुलकावणीच दिली. दुसरीकडे, आयपीएलच्या पहिल्याच सत्रातील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) वैयक्तिक शतक ठोकले होते. विशेष म्हणजे हे आतापर्यंतचे केकेआरकडून झळकलेले एकमेव वैयक्तिक शतक आहे आणि तरीही त्यांनी दोनवेळा जेतेपदावर नाव कोरले आहे. दहा किंवा त्याहून अधिक वैयक्तिक शतके झळकावणारे संघ आहेत पंजाब किंग्ज (PK), रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC). विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील आरसीबी आणि लोकेश राहुलच्या नेतृत्त्वातील पंजाब किंग्ज या संघांकडून प्रत्येकी १३ वैयक्तिक शतके झळकावली गेली आहेत. तसेच, ॠषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्सकडून १० वेळा अशी कामगिरी झाली आहे. गंमत म्हणजे या तिन्ही संघांना एकदाही जेतेपद उंचावण्याची संधी मिळालेली नाही.
जेतेपदासाठी सांघिक खेळ अत्यंत महत्त्वाच ठरतो आणि हेच सिद्ध केले आहे ते चॅम्पियन मुंबई इंडियन्सने. मुंबईकडून आतापर्यंत केवळ ४ वैयक्तिक शतके झळकावली आहेत. मात्र, कोणा एका खेळाडूवर विसंबून न राहणाºया मुंबईने एक नाही, दोन नाही, तर तब्बल पाचवेळा आयपीएल जेतेपदावर कब्जा केला आहे. मुंबईकडून सर्वाधिक धावांची वैयक्तिक खेळी सनथ जयसूर्याच्या नावावर असुन त्याने नाबाद ११४ धावा ठोकल्या होत्या. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनेही सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना तीन वेळा जेतेपद उंचावले. सीएसकेने आतापर्यंत ८ वेळा वैयक्तिक शतके झळकावली आहेत. चेन्नईचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन यानेच एकट्याने तब्बल ४ शतके झळकावली आहेत.
१. पंजाब किंग्ज - १३२. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर - १३३. दिल्ली कॅपिटल्स - १०४. चेन्नई सुपरकिंग्ज - ८ (तीन जेतेपद)५. राजस्थान रॉयल्स - ७ (एक जेतेपद)६. मुंबई इंडियन्स - ४ ( पाच जेतेपद)७. सनरायझर्स हैदराबाद - ३ (एक जेतेपद)८. कोलकाता नाईट रायडर्स - १ (दोन जेतेपद)