-ललित झांबरे
आरसीबीच्या (RCB) देवदत्त पडीक्कलने (Devdutt Padikkal) शुक्रवारी राजस्थान राॕयल्सविरुध्द (RR) 52 चेंडूतच 101 धावांची शानदार शतकी खेळी केली आणि 2000 नंतर जन्मलेला तो आयपीएलचा पहिला शतकवीर ठरला. 7 जुलै 2000 ही त्याची जन्मतारीख आहे. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात कमी वयाचाही शतकवीर ठरला आहे. त्याच्यापेक्षा कमी वयात मनिष पांडे व रिषभ पंत यांनी आयपीएलमध्ये शतक केलेले आहे पण हे दोघे सन 2000 च्या आधीची जन्मतारीख असलेले खेळाडू आहेत. त्यामुळे कमी वयाच्या शतकवीरांमध्ये देवदत्त वेगळा ठरला आहे. (Do you know the coincidence of Devdutt Padikkal's century with Paul Valthati?)
आयपीएलमधील कमी वयाचे शतकवीर
19 वर्ष 253 दिवस- मनीष पांडे, 2009
20 वर्ष 218 दिवस- रिषभ पंत, 2018
20 वर्ष 289 दिवस- देवदत्त पडीक्कल, 2021
22 वर्ष 151 दिवस- संजू सॕमसन, 2017
याशिवाय आणखी एक दखल घेण्याजोगी बाब म्हणजे देवदत्तने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही म्हणजे तो अनकॕपड् खेळाडू आहे. आणि अनकॕपड् खेळाडूंमध्ये सर्वात जलद शतक - फक्त 51 चेंडूतच- त्याच्या नावावर आहे. आतापर्यंत हा विक्रम पॉल वल्थाटीच्या (Paul Valthaty) नावावर होता. पॉलने 2011 मध्ये किंग्ज इलेव्हनसाठी सीएसकेविरुध्द 52 चेंडूतच शतक झळकावले होते तो विक्रम देवदत्तने फक्त एकाच चेंडूने मोडला.
याच शतकाबाबत देवदत्त आणि पाॕल वल्थाटीदरम्यान विलक्षण योगायोग समोर आला आहे. एकतर हे दोन्ही शतकवीर अनकॕपड् आहेत. दोघांचीही शतके पाठलाग करताना झाली आहेत. दोघांनीही चौकारांनीच आणि 17 व्या षटकातच आपले शतक साजरे केले. त्यासाठी दोघांनीही जवळपास सारखेच चेंडू घेतले -देवदत्तने 51 तर पाॕलने 52 आणि दोन्ही सामन्यात त्याचे जे इतर साथीदार खेळाडू होते त्यांचे योगदान सारखेच 72 धावांचे राहिले, दोघांच्याही शतकाने त्यांचे संघ विजयी ठरले आणि दोघेही त्या त्या सामन्याचे सामनावीर ठरले.
आता आणखी एक योगायोग घडू शकतो पण तो घडू नये अशी इच्छा आहे. तो म्हणजे पाॕल वल्थाटीला अद्यापही आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळालेला नाही. तसे देवदत्तच्या बाबतीत घडू नये.
तसे आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळायच्या आधीच शतक झळकावलेले आणखी दोन फलंदाज आहेत मनिष पांडे व शाॕन मार्श पण त्यांना पुढे आंतरराष्ट्रीय सामना खेळायची संधी मिळाली. तसेच देवदत्तबाबत घडो अशीच क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल.
Web Title: IPL 2021: Do you know the coincidence of Devdutt Padikkal's century with Paul Valthati?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.