मुंबई - आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा दहा गडी राखून पराभव केला. (IPL 2021) या विजयासह बंगळुरूने सलग चार विजयांसह यंदाच्या हंगामात विजयी चौकार ठोकला आहे. (RCB Vs RR) या सामन्यात १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युवा देवदत्त पडिक्कल याने केलेली शतकी निर्णायक ठरली होती. या खेळीदरम्यान, शतकाच्या उंबरठ्यावर असताना देवदत्त पडिक्कलने विराट कोहलीला सामना संपवून टाकण्यास सांगितले होते. त्यानंतर विराट कोहलीने पडिक्कलला जे उत्तर दिले ते वाचून तुम्ही त्याचे कौतुक केल्याविना राहणार नाही.
विराट म्हणाला की, देवदत्त पडिक्कल शतकाच्या उंबरठ्यावर होता. तेव्हा त्याने मला सांगितले की, तू तुझे फटके खेळ. माझ्या अनेक खेळी अजून बाकी आहेत. मात्र मी त्याला म्हणालो की, जर हे तुझे पहिले शतक नसते तर मी असे केले असते. तू तुझे शकत पूर्ण करत. दरम्यान विराटच्या या सल्ल्यानंतर देवदत्तने फटकेबाजी सुरू ठेवत आयपीएलमधील आपले पहिले शतक पूर्ण केले.
या सामन्यात १०१ धावांची नाबाद शतकी खेळी करणाऱ्या पडिक्कलने सामन्यानंतर सांगितले की , खरं सांगायचं तर आजचा दिवसा माझ्यासाठी खास ठरला. मी केवळ खेळण्यासाठीच्या संधीची वाट पाहत होतो. कोरोनाचा संसर्ग झाला होता तेव्हा मी केवळ इथे येऊन खेळू इच्छित होतो. मला पहिल्या सामन्यात खेळता आले नाही. मला ती बाब खटकत होती. या सामन्यासाठीची खेळपट्टी चांगली होती. जेव्हा अशी भागीदारी होते तेव्हा सर्वच गोष्टी सोप्या होऊन जातात. शतकाच्या जवळ पोहोचलो तरी मी तणावामध्ये नव्हतो. मी विराटला सांगितले की सामना संपवून टाक. अखेरीस माझे शतक झाले नाही चालेल पण संघाचा विजय महत्त्वाचा आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सवरील विजयाबरोबरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या हंगामातील आपला सलग चौथा विजय साजरा केला आहे. स्पर्धेत पहिले चारही सामने जिंकण्याची बंगळुरूची ही पहिलीच वेळ आहे. या विजयसह बंगळुरूने चेन्नई सुपरकिंग्सला मागे टाकत गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले आहे.