-ललित झांबरे
रॉयल चॕलेंजर्स बंगलोरच्या (royal challengers bangalore) हर्षल पटेलने (harshal patel) आयपीएल 2021 ला दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सविरुध्द 27 धावात 5 बळी मिळवले. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 22 वेळा गोलंदाजांनी सामन्यात 5 किंवा अधिक बळी टिपले आहेत. त्यात जयदेव उनाडकटनं तब्बल दोन वेळा पाच खेळाडू बाद करण्याची किमया साधली आहे.
भारतीय गोलंदाजांपुरता विचार केला तर आतापर्यंत 13 भारतीय गोलंदाजांनी आयपीएल सामन्यात 5 किंवा अधिक बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, आयपीएलच्या पहिल्या 10 मोसमात 10 भारतीय गोलंदाजांनी एकाच सामन्यात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आणि ते सर्वच्या सर्व गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले. टीम इंडियात त्यांना स्थान मिळालं. त्यात अनिल कुंबळे, इशांत शर्मा, अजय जडेजा, अमीत मिश्रा, हरभजनसिंग, भूवनेश्वर कुमार, मूनाफ पटेल, लक्ष्मीपती बालाजी व जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे.
गेल्या चार मोसमातील चित्र याच्या अगदी उलट आहे. गेल्या चार मोसमात आरसीबीचा हर्षल पटेल, केकेआरचा वरुण चक्रवर्ती आणि किंग्ज इलेव्हनचा अंकित राजपूत यांनी डावात 5 बळी मिळवले आहेत पण यापैकी कुणालाही अद्याप आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. वरुण चक्रवर्तीची आॕस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड झाली होती. पण संघात संधी मिळाली नाही.