स्ट्रेट ड्राईव्ह,सुनील गावस्कर
हैदराबादने अन्य संघांचा गेम करणे सुरू केले का? हैदराबादकडून सहज पराभूत झालेला राजस्थान संघ असाच विचार करीत असावा. येथे केवळ सहज विजय मिळविण्याचा प्रश्न नाही, ताजेतवाने होऊन खेळण्याचा हैदराबादचा अंदाज पाहून त्यांचा सामना करणाऱ्या अन्य संघांना धडकी भरली असावी. डेव्हिड वॉर्नरला बाहेर काढणे हा मोठा निर्णय होता. त्याने याआधी सर्वच पवरात जवळपास मोठ्या धावा केल्या; पण ऑस्ट्रेलियात जखमी झाल्यापासून त्याचा धडाका कमी झाला. यामुळे भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांतून देखील तो बाहेर होता.
दुसरा मोठा निर्णय केदार जाधव याला न खेळविणे हा होता. या मोसमात तो योगदान देऊ शकला नाही. यामुळे अष्टपैलू अभिषेक शर्मा याच्यातील चुणूक दिसून आली. तो डावखुरा असल्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत कर्णधारासाठी उपयुक्त ठरू शकतो. अभिषेकने मिळालेल्या संधीचे सोने केले. केन विलियमसनसोबतच्या भागीदारीतून राजस्थानविरुद्ध हैदराबाद संघ रुळावरून घसरू नये याची त्याने खातरजमा केली.
हैदराबाद आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात दोन ‘कूल’ कर्णधार परस्परांपुढे असतील. केकेआरने सामन्यावर जवळपास ताबा मिळविला तेव्हा देखील धोनी शांतचित्त दिसला. रवींद्र जडेजाने त्याचा विश्वास संपादन करीत १९ व्या षटकात २० धावा ठोकून विजय दृष्टिपथात आणला. चेन्नईने हैदराबादला नमविल्यास त्यांचा प्ले ऑफ प्रवेश निश्चित होईल. त्यामुळे प्ले ऑफआधी महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा पर्याय देखील असेल. बरेचदा खेळाडू विश्रांती घेण्याचा धोका पत्करू नाहीत. यामुळे लय कमी होईल, अशी त्यांना भीती वाटते. गरम, रेताळ आणि दमट हवामानात मात्र फिट खेळाडूदेखील लवकर थकतात. अशावेळी काही प्रमाणात विश्रांती लाभदायी ठरू शकते.
चेन्नई संघात ३० वर्षे वयाचे अधिक खेळाडू आहेत. हे खेळाडू विश्रांती घेत स्वत:ला सज्ज ठेवू शकतील. दुसरीकडे अशा खेळाडूंचा अनुभव कठीण स्थितीतही धाडस दाखविण्यात उपयुक्त ठरतो. फसलेल्या सामन्यात विजयापर्यंतचा मार्ग काढण्याची कला त्यांना अवगत असते. गुरुवारच्या लढतीत दोन्ही संघांतील खेळाडू आणि दोन्ही ‘कूल’ कर्णधारांवर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.