IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) कधी, केव्हा व कसे कमबॅक करतील याचा नेम नाही. आयपीएल फायनलमध्ये १९०+ लक्ष्याचा दोनवेळा यशस्वी पाठलाग करणारा कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यंदाही तो करिष्मा करतील असे वाटत होते. वेंकटेश अय्यर व शुबमन गिल यांनी KKRला सुरुवातही तशी दणक्यात करून दिली, परंतु शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) च्या एका षटकानं सामना फिरवला अन् त्यानंतर CSKनं सॉलिड कमबॅक केले. बिनबाद ९१ अशा मजबूत स्थितीत असलेल्या KKRचा डाव गडगडला. चेन्नई सुपर किंग्सनं चौथ्यांदा IPL Trophy जिंकली. चेन्नई सुपर किंग्सनं IPL 2021 Final जिंकून हा जेतेपदाचा चौकार खेचला. IPL 2020 साखळी फेरीतच बाहेर झालेल्या CSKचे कमबॅक पाहून सारेच अवाक् झाले. ( MS Dhoni wins CSK's 4th IPL title in his 300th T20 match as captain)
ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराजनं वैयक्तित ३२ धावा करताना फॅफसह पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. फॅफला तिसऱ्या षटकात दिनेश कार्तिकनं ( यष्टिचीत) जीवदान दिलं. त्यानंतर रॉबीन उथप्पानं १५ चेंडूंत ३ खणखणीत षटकारांसह ३१ धावा कुटल्या. मोईन अली अली २० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. फॅफनं ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा केल्या आणि चेन्नईला २० षटकांत ३ बाद १९२ धावा उभारून दिल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. Chennai Super king vs Kolkata Knight Rider Final in Dubai
प्रत्युत्तरात शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनीही धुरळा उडवला. महेंद्रसिंग धोनीकडून क्वचितच चूक होताना दिसते अन् ती आजच्याच सामन्यात झाली. वेंकटेश शून्यावर असताना धोनीकडून त्याचा झेल सुटला. दीपक चहर, शार्दूल ठाकूर, जोश हेझलवूड यांचे ही जोडी तोडण्याचे सारे डावपेच फसले. वेंकटेशनं ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रवींद्र जडेजाच्या त्या षटकात गिलनं उत्तुंग फटका टोलावला अन् अंबाती रायुडूनं तो चेंडू टिपला. CSKच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला, परंतु हवेत झेपावलेला चेंडू स्पायडर कॅमेराच्या तारेवर आदळल्याचे स्पष्ट दिसले अन् गिलला जीवदान मिळाले.
११व्या षटकात KKRच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा CSKचा संकटमोचक ठरला. त्यानं ११व्या षटकात वेंकटेश ( ५०) व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. पुढच्याच षटकात जोश हेझलवूडनं KKRला आणखी एक धक्का देताना सुनील नरीनची ( २) विकेट काढली. दीपक चहरनं १४व्या षटकात KKRला मोठा धक्का दिला. चहरच्या फुलटॉसवर पहिल्या स्टम्पवर लेगसाईटला फटका मारण्याच्या प्रयत्नात गिल पायचीत झाला. तो ५१ धावांवर माघारी परतला. दिनेश कार्तिकनं पहिल्याच चेंडूवर पुल शॉट मारून षटकार खेचला, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो रायुडीच्या हाती झेल देऊन परतला. शाकिब अल हसनलाही जडेजानं पायचीत केलं. बिनबाद ९१ वरून KKRची अवस्था ६ बाद १२० अशी झाली.