IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस या जोडीनं चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) डोलारा सक्षमपणे आपल्या खांद्यावर उचलला. या संपूर्ण स्पर्धेत या जोडीनं प्रतिस्पर्धींच्या गोलंदाजांनी दैना उडवली. IPL 2021 Final मध्ये कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्धच्या सामन्यातही ही जोडी अभेद्य भींतीसारखी उभी राहिली आणि चेन्नईला दमदार सुरुवात करून दिली. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी सलामीवीर म्हणून या जोडीनं मान मिळवलाच, शिवाय त्यांनी पाकिस्तानच्या बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांचाही मोठा विक्रम मोडला.
फिरकीपटूंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कोलकातानं अंतिम फेरीत प्रवेश केला आणि चेन्नईविरुद्ध त्यांनी त्याच जोरावर वर्चस्व गाजवण्याचा डाव आखला. त्यांना यश मिळालेली असते, परंतु दिनेश कार्तिकनं तिसऱ्या षटकात फॅफ ड्यू प्लेलिससला यष्टिचीत करण्याची संधी गमावली. ऋतुराज गायकवाड दुसऱ्या बाजूनं कोलकाताच्या गोलंदाजांना न जुमानता फटकेबाजी करत होता. आयपीएल इतिहासात orange cap जिंकणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. त्यानं लोकेश राहुलच्या ६२६ धावांपेक्षा अधिक धावा या पर्वात केल्या आहेत. ( Ruturaj Gaikwad becomes the youngest to win the orange cap in IPL history). फॅफ व ऋतुराज या जोडीनं आणखी एकदा CSKसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
९व्या षटकात KKRनं सुनील नरीनला पाचारण केलं आणि त्यानं CSKला मोठा धक्का दिला. ऋतुराज त्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शिवम मावीच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ऋतुराजनं २७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३२ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराज व फॅफ ड्यू प्लेसिस जोडीनं ७५२* धावांची भागीदारी केली. त्यांनी शिखर धवन व पृथ्वी शॉ ( २०२१) यांचा ७४४ धावांचा विक्रम मोडला. आयपीएलमध्ये सर्वाधिक ७९१ धावा करणाऱ्या सलामीवीरांचा विक्रम जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांनी २०१९च्या पर्वात केला होता.
ऋतुराज व फॅफ यांनी यंदाच्या वर्षात पुरुष ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी जोडीचा मानही पटकावला. त्यांनी पाकिस्तानच्या बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांचा ७३६ धावांचा विक्रम मोडला.