IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला सडेतोड उत्तर दिले. शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनी दमदार खेळी करताना पहिल्या विकेटसाठी ९१ धावा जोडल्या. अय्यरला शून्यावर जीवदान मिळाले अन् त्यानं अर्धशतक झळकावले. १०व्या षटकात एक मजेशीर किस्सा घडला अन् गिलची झेल पकडूनही CSKला विकेट नाही मिळाली.
चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) फलंदाजांनी पुन्हा एकदा त्यांचा फॉर्म दाखवून दिला. ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी साकारण्यात अपयश आलं असलं तरी त्यानं फॅफ ड्यू प्लेसिससह CSKला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर रॉबीन उथप्पा व मोईन अली यांनी दमदार फटकेबाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांची धुलाई केली. मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलताना फॅफनं अखेरपर्यंत फटकेबाजी करून ८६ धावा जोडल्या.
ऋतुराज व फॅफ ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराजनं वैयक्तित ३२ धावा करताना फॅफसह पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. फॅफला तिसऱ्या षटकात दिनेश कार्तिकनं ( यष्टिचीत) जीवदान दिलं. त्यानंतर रॉबीन उथप्पानं १५ चेंडूंत ३ खणखणीत षटकारांसह ३१ धावा कुटल्या. मोईन अली अली २० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. फॅफनं ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा केल्या आणि चेन्नईला २० षटकांत ३ बाद १९२ धावा उभारून दिल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनीही धुरळा उडवला. महेंद्रसिंग धोनीकडून क्वचितच चूक होताना दिसते अन् ती आजच्याच सामन्यात झाली. वेंकटेश शून्यावर असताना धोनीकडून त्याचा झेल सुटला. दीपक चहर, शार्दूल ठाकूर, जोश हेझलवूड यांचे ही जोडी तोडण्याचे सारे डावपेच फसले. वेंकटेशनं ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रवींद्र जडेजाच्या त्या षटकात गिलनं उत्तुंग फटका टोलावला अन् अंबाती रायुडूनं तो चेंडू टिपला. CSKच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला, परंतु हवेत झेपावलेला चेंडू स्पायडर कॅमेराच्या तारेवर आदळल्याचे स्पष्ट दिसले अन् गिलला जीवदान मिळाले.