शारजा : आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या याला गोलंदाजी करण्यास बाध्य करता येणार नाही. असे झाल्यास त्याला त्रास होऊ शकतो, अशी भीती मुंबई इंडियन्सचे कोच माहेला जयवर्धने यांनी शुक्रवारी व्यक्त केली. हार्दिककडून गोलंदाजी करून घेण्याची घाई नाही. सध्या गोलंदाजी केल्यास आगामी टी-२० विश्वचषकातील सामन्यात त्याचे विपरीत परिणाम जाणवू शकतात. पहिल्या दोन सामन्यात खेळू न शकलेल्या हार्दिकला मुंबईने नंतरच्या सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळविले. यामुळे भारताच्या टी-२० संघातील त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. निवडकर्त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.
जयवर्धने म्हणाले,‘हार्दिकसंदर्भात मुंबई संघ भारतीय संघ व्यवस्थापनाच्या सतत संपर्कात आहे. हार्दिकने दीर्घकाळापासून गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळेच हार्दिकबाबत सर्वश्रेष्ठ निर्णय घेण्याच्या स्थितीत आहोत. तो आयपीएल सामन्यात गोलंदाजी करू शकतो का, हे प्रत्येक दिवसाच्या आधारे ठरविले जाईल. सध्यातरी त्याला गोलंदाजी करण्यास बाध्य केल्यास जुनी जखम पुन्हा उचल खावू शकेल.’
हार्दिकने २०१९ ला पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन केले; पण आधीसारखी सतत गोलंदाजी केली नाही. मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याने मुख्य गोलंदाज या नात्याने मारा केला. नंतर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात तो गोलंदाजी करू शकला नाही. यूएईत मुंबईला चारपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळाला तरी हार्दिक केवळ फलंदाज म्हणून संघात होता. अव्वल चार संघात स्थान मिळविण्यासाठी लौकिकास्पद खेळ करू, असे जयवर्धने यांनी म्हटले आहे.