दुबई: चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज रविवारी होणाऱ्या धडाकेबाज आणि तुल्यबळ सामन्याद्वारे इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. मुंबईने ७ पैकी ४ तर चेन्नईने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. मागच्या सत्रात दारुण कामगिरी करणाऱ्या चेन्नईला ऋतुराज गायकवाड,इम्रान ताहिर, मोईन अली रवींद्र जडेजा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना हे देखील फॉर्ममध्ये परतण्याची आशा आहे.
मुंबईला फलंदाजीत मधल्या फळीत आणि गोलंदाजीत पॉवर प्लेमध्ये कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि लेगस्पिनर राहुल चहर यांनी विश्वचषकासाठी संघात स्थान मिळविल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासत भर पडली असावी. हार्दिकने नियमित गोलंदाजी केल्यास पर्याय उपलब्ध असतील.
आयपीएलचा दूसरा टप्पा सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने कोणता संघ बाजी मारणार यावर भाष्य केलं आहे. दुसऱ्या टप्प्यात आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. माझ्या मते दिल्ली आणि मुंबईची टीम विजेतेपदाची दावेदार असेल, असं सेहवागने स्पष्ट केलं आहे. पहिल्या टप्प्यात चेन्नईचा सरासरी स्कोअर २०१ होता. पण यूएईच्या पिचवर त्यांच्या बॅटींगवर परिणाम होईल, असं मला वाटतं. मला एका टीमची निवड करायची असेल तर ती टीम मुंबई असेल, असं सेहवागने यावेळी सांगितलं.
दरम्यान, विश्वचषकानंतर टी-२० चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणारा विराट कोहली आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देण्यात इच्छूक असेल. दुसरीकडे मागील सत्रातील उपविजेत्या दिल्लीला पहिल्या जेतेपदाची अपेक्षा आहे. गुणतालिकेत दिल्ली अव्वल असून चेन्नई, बॅंगलोर आणि मुंबई हे पहिल्या चार स्थानांवर आहेत. पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना मात्र काही खेळाडूंच्या माघारीचा फटका बसला. अन्य खेळाडू त्यांची उणिव कशी भरुन काढतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सचिन दुबईच्या मैदानात-
महान फलंदाज सचिन तेंडुलकर यूएईत दाखल झाला. तो मुंबई इंडियन्स पथकाचा मेंटॉर आहे. याशिवाय संघाला मार्गदर्शन तसेच सपोर्ट स्टाफला सहकार्य करतो.सचिनची उपस्थिती खेळाडूंसाठी मनोबल उंचावणारी ठरते. विशेष म्हणजे त्याला मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील याच संघातून खेळतो.पाच दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर शनिवारी सचिनने दुबई स्टेडियमला भेट दिली.