Join us  

भारतीय ट्वेन्टी-२० संघात चहलला जागा न दिल्यानं सेहवाग संतापला, म्हणाला...'स्पष्टीकरण द्या!'

IPL 2021, Yuzvendra Chahal: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात युजवेंद्र चहल याची निवड न झाल्याबाबत माजी क्रिकेटपटूंनीही सवाल उपस्थित केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 11:28 AM

Open in App

IPL 2021, Yuzvendra Chahal: आयपीएलमध्ये रविवारी संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध ५४ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. आरसीबीनं या विजयासह प्ले-ऑफमधलं आपलं स्थान देखील जवळपास पक्कं केलं आहे. हर्षल पटेल (Harshal Patel), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांनी जबरदस्त गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सला धक्का दिला. हर्षल पटेलनं सामन्यात हॅट्ट्रीकसह एकूण चार विकेट्स मिळवल्या, तर युजवेंद्र चहलनं तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं. कामगिरीत सातत्य राखूनही आगामी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात युजवेंद्र चहल याची निवड न झाल्याबाबत माजी क्रिकेटपटूंनीही सवाल उपस्थित केले आहेत. त्यात आता भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचीही भर पडली आहे. 

आयपीएलच्या हॕट्ट्रिकविरांमध्ये हर्षल पटेल 'असा' केवळ दुसराच! 

युजवेंद्र चहलनं मुंबई विरुद्ध तीन तगड्या फलंदाजांना माघारी धाडलं आणि बंगलोरला सामन्यात पकड मिळवू दिली. क्रिकबज लाइव्हवरील एका कार्यक्रमात बोलताना सेहवागनं युजवेंद्र चहल अतिशय चतुर गोलंदाज असल्याचं म्हटलं. चहलची भारतीय संघात निवड का झाली नाही? याचं स्पष्टीकरण निवड समितीनं द्यायला हवं, असं स्पष्ट मत सेहवागनं व्यक्त केलं आहे. "चहलनं फक्त कालच्याच सामन्यात चांगली गोलंदाजी केली असं नाही. त्यानं सातत्यानं दमदार गोलंदाजी केली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी त्याची निवड न केली जाणं यामागचं कारण मला काही कळत नाही. युजवेंद्रला ट्वेन्टी-२० त भारतीय संघातून बाहेर का करण्यात आलं याचं स्पष्टीकरण निवड समितीच्या सदस्यांनी द्यायला हवं. राहुल चहरनंही श्रीलंका दौऱ्यात उत्तम गोलंदाजी केली. पण चहल ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय ते पाहता भारताच्या ट्वेन्टी-२० संघासाठी तो महत्त्वाचा दुवा आहे", असं सेहवाग म्हणाला. 

रवींद्र जडेजानं मैदानावर वादळ आणलं, पण मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार हळव्या मनानं लेकीला समर्पित केलं 

युजवेंद्र चहल यानं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात ४ षटकांमध्ये केवळ ११ धावा देत तीन विकेट्स मिळवल्या. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात युजवेंद्र चहल याला संघात स्थान न देता राहुल चहर आणि इतर फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. निवड समितीचा हा निर्णय सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे. भारतीय संघात रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि राहुल चहर यांची निवड झाली आहे. दरम्यान, भारतीय संघात बदल करण्याची संधी बीसीसीआयकडे असणार आहे. येत्या १० ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करण्याची मुभा आयसीसीनं सर्व क्रिकेट बोर्डांना दिली आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून संघात बदल केले जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१विरेंद्र सेहवागयुजवेंद्र चहलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App