मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्व संघांनी किमान एका विजयासह गुणांचे खाते उघडले असताना, दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादला मात्र सलग तीन सामने गमवावे लागले. यामुळे गुणतालिकेत त्यांना तळाच्या स्थानी समाधान मानावे लागले होते. मात्र, बुधवारी त्यांनी जबरदस्त खेळ करताना पंजाब किंग्जचा ९ गड्यांनी धुव्वा उडवला आणि गुणतालिकेत थेट पाचव्या स्थानी झेप घेतली. हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो जॉनी बेयरस्टो ( Johnny Bairstow). परंतु, विजयानंतर याच बेयरस्टोची मस्ती करण्याचा नाद युवा प्रियम गर्गला (Prim Garg) भोवला आणि त्याची हालत खराब झाली.
यंदाच्या सत्रातील पहिला विजय मिळवल्यानंतर हैदराबाद संघाचे हॉटेलमध्ये जल्लोषात स्वागत झाले. या जल्लोषाचा व्हिडिओ हैदराबाद संघाने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. टॉस जिंकून पंजाबने खेळपट्टी ओळखून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादने टिच्चून मारा करतान पंजाबला १२० धावांमध्ये रोखले. यानंतर बेयरस्टोच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने केवळ एक बळी गमावत दिमाखात पहिला विजय नोंदवला.
बेयरस्टो आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी ६१ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी करत हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. वॉर्नर बाद झाल्यानंतर अनुभवी केन विलियम्सनने बेयरस्टोला साथ देत संघाच्या विजयावर शिक्का मारला. बेयरस्टोने ५६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६३ धावांची विजयी खेळी केली. यामुळे सामनावीर म्हणूनही त्याचीच निवड झाली.
या शानदार विजयानंतर हैदराबादचे हॉटेलमध्ये जबरदस्त स्वागत झाले. यावेळी हैदराबादच्या आॅरेंज कलरमध्ये तयार करण्यात आलेला केक कपण्याचा मान सामनावीर बेयरस्टोला देण्यात आला. यावेळी युवा खेळाडू प्रियम गर्ग केकचा मोठा तुकडा घेऊन बेयरस्टोला फासायला पुढे आला. बेयरस्टो नाही म्हणत असतानाही, प्रियमने केक त्याच्या चेहऱ्यावर फासलाच. यानंतर बेयरस्टोने प्रियमची धाव घेत त्याला पकडले आणि त्यालाही केक फासून त्याची हालत खराब करुन टाकली.
हैदराबादच्या या धमाकेदार सेलिब्रेशचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनीही हैदराबादला शुभेच्छा देतानाच आता कामगिरीत सातत्य राखा, असे म्हटले आहे.
Web Title: IPL 2021: The fun with Jonny Bairstow cost Priyam Garg dearly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.