IPL 2021: आयपीएलचं १४ वं सीझन नुकतंच संपलं आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघानं यंदाच्या जेतेपदावर नाव कोरलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं आयपीएलमधील हे चौथं विजेतेपद ठरलं. चेन्नईचा संघ गेल्या सीझनमध्ये प्ले-ऑफमध्येही पोहोचू शकला नव्हता. मात्र यंदा दमदार पुनरागमन करत संघानं जेतेपद पटकावलं. आयपीएलमधील सर्वोत यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीचं नाव घेतलं जातं. पण भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर अजूनही धोनीला सर्वोत्तम कर्णधार मानत नाही. त्यानं यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीरनं आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधारपदाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली. धोनी आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार असल्याचा मुद्दा गंभीरनं खोडून काढला. "धोनी नव्हे, तर रोहित शर्माच आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार आहे. कारण धोनीकडे चार, तर दुसरीकडे रोहितनं पाच जेतेपदं नावावर केली आहेत. त्यामुळे अजूनही रोहितच आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार असल्याचं स्पष्ट होतं", असं गौतम गंभीर म्हणाला.
चेन्नईच्या कामगिरीवर काय म्हणाला गंभीर?
चेन्नईच्या सलामीवीरांनी शानदार कामगिरी केली आणि संघाला यश प्राप्त करुन दिलं. चेन्नईची सलामी जोडी ऋतूराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी सलामीसाठी तब्बल ७५६ धावा केल्या. यात ऋतूराज गायकवाडनं ऑरेंज कॅप पटकावली. स्पर्धेत ऋतूराजनं ६३५, तर फॅफनं ६३३ धावा केल्या आहेत. "चेन्नईच्या विजयात सलामीजोडीचं खूप मोठं योगदान राहिलं आहे. अगदी १०० टक्के म्हणता येणार नाही. कारण मोईन अली, रॉबीन उथप्पा यांच्यासोबत गोलंदाजांनीही दमदार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. ज्यापद्धतीनं या खेळाडूंनी आपला फॉर्म दाखवला आहे ती नक्कीच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे", असं गंभीर म्हणाला.
Web Title: ipl 2021 Gautam gambhir on who is the best captain of ipl ms dhoni and rohit sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.