IPL 2021: आयपीएल 2021 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidabaram Stadium) लढत झाली. कोलकातानं या सामन्यात १० धावांनी हैदराबादवर मात केली. हैदराबादनं सामना गमावला असला तरी संघातील एका युवा क्रिकेटपटूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या खेळाडूचं नाव आहे अब्दुल समद (Abdul Samad)
कोलकातानं हैदराबादसमोर विजयासाठी १८७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली होती. सामन्यात जेव्हा हैदराबादला कमी चेंडूत अधिक धावांची गरज होती. त्यावेळी अब्दुल समद यानं आपली ताकद दाखवून दिली. जगातील वेगवान गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या पॅट कमिन्स याला कोलकातानं १५ कोटी रुपयांच्या बोलीसह संघात दाखल करुन घेतलं आहे. याच पॅट कमिन्सला अब्दुल समदनं दोन खणखणीत षटकार लगावले. समदनं लगावलेल्या षटकारांमध्ये मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पंड्याची झलक पाहायला मिळाली.
हैदराबादच्या डावाच्या १९ व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर अब्दुल समदनं डीप मिडविकेटच्या दिशेनं खणखणीत षटकार लगावला. समद लगावलेला फटका इतका उत्तुंग होता की पॅट कमिन्सही पाहात राहिला. समदनं तब्बल ९३ मीटर इतका दमदार षटकार ठोकला. पुढचा चेंडू कमिन्सनं यॉर्कर टाकला पण त्याही चेंडूवर समदनं हार्दिक पंड्या स्टाइलनं षटकार हाणला आणि हैदराबादच्या ताफ्यात एकच जल्लोष सुरू झाला. समदनं लगावलेले षटकार पाहून कर्णधार डेव्हिड वॉर्नर देखील आश्चर्यचकीत झाला आणि त्यानं टाळ्या वाजवत समदला प्रोत्साहन दिलं. सदमच्या फलंदाजीवर कर्णधार वॉर्नर जाम खुश झाल्याचं पाहायला मिळालं.