चेन्नई : मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला खांदेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे त्याने आरसीबीविरुद्ध पहिल्या सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. तथापि तो लवकरच गोलंदाजीत योगदान देईल, असा विश्वास संघाचे क्रिकेट संचालक झहीर खान यांनी व्यक्त केला.पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईला आरसीबीनीने दोन गड्यांनी नमविले होते. आज मंगळवारी मुंबईचा सामना केकेआरविरुद्ध होणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झहीरने सांगितले की, हार्दिक परिपूर्ण खेळाडू असून, संघासाठी महत्त्वाचा आहे. मागच्या सामन्यात कामाचा भार हलका व्हावा यासाठी तो गोलंदाजीपासून दूर राहिला. इंग्लंडविरुद्ध मालिकेत हार्दिकने गोलंदाजी केली होती. अखेरच्या वन डेत त्याने नऊ षटके टाकली. फिजिओने दिलेल्या सल्ल्यामुळे आम्ही त्याला गोलंदाजीपासून दूर ठेवले.’वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किएरॉन पोलार्ड हा सहावा गोलंदाज म्हणून पर्याय असल्याचे सांगून झहीर म्हणाले, ‘गोलंदाजी ही चिंतेचा विषय नाही, केवळ परिस्थितीशी ताळमेळ साधणे गरजेचे असेल. यंदा सर्वच सामने तटस्थस्थळी खेळले जात आहेत. द. आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज क्विंटन डिकॉक हा उद्याच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.
‘हार्दिकला खांदेदुखीचा त्रास आहेच. मात्र चिंता करण्यासारखे काहीही नाही. आपण त्याला लवकरच गोलंदाजी करताना पाहाल. तो गोलंदाजी आणि फलंदाजीत सारखेच योगदान देईल, असा विश्वास आहे’, - झहीर खान