IPL 2021, KKR: आयपीएलच्या १४ व्या सीझनचा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळविण्यात येतोय. भारतात खेळविण्यात आलेला पहिला टप्पा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करावा लागला होता. आता याच सीझनच्या उत्तरार्धाला यूएईमध्ये सुरुवात झाली आहे. मैदानाताली थरारक लढतीनंतर प्रत्येक फ्रँचायझी आपल्या खेळाडूंच्या मनोरंजनासाठी 'ऑफ द फिल्ड' विविध खेळ किंवा मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असते. कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू देखील असाच एक अनोखा खेळ खेळताना पाहायला मिळाले.
कोलकाता नाइट रायडर्स संघाचे खेळाडू यूएईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बायो-बललच्या नियमांचं पालन करत वास्तव्याला आहेत. नुकतंच खेळाडूंनी हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये धमाल मस्ती केली. यात खेळाडू एक अनोखा खेळ खेळताना पाहायला मिळाले. स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंनी केकेआर फाइट क्लब खेळ खेळला. यासाठी केकेआरच्या खेळाडूंच्या तीन टीम्स तयार करण्यात आल्या होत्या. यात स्विमिंग पूलमध्ये संघातील एका खेळाडूला आपल्या सहकाऱ्याला खांद्यावर उचलून धरायचं होतं आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला पाण्यात पाडायचं असा हा अनोखा फाइट क्लब होता.
केकेआरचे खेळाडू या आगळ्यावेगळ्या खेळाच्या माध्यमातून धमाल-मस्ती करताना पाहायला मिळतात. खेळाच्या अखेरीस केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसेल यानं बाजी मारली आहे.