मुंबई - विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ( (Royal Challengers Bangalore) ) आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. काल रात्री राजस्थानविरुद्ध ( (Rajasthan Royals) )झालेल्या लढतीत आरसीबीने विजय मिळवत यंदाच्या हंगामातील सलग चौथ्या विजयाची नोंद केली होती. दरम्यान, सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅप ताब्यात ठेवणाऱ्या हर्षल पटेलने या लढतीतही ३ बळी टिपले. मात्र यावेळी राजस्थानचा फलंदाज रियान पराग याचा बळी घेतल्यानंतर हर्षल पटेलचा (Harshal Patel) तोल ढळला आणि त्याने रियान परागच्या दिशेने पाहून काही इशारा केला. (Hershel Patel loses Patience after dismissing Riyaan Parag)
हर्षल पटेलने या सामन्यात ४७ धावा मोजत तीन बळी टिपले. यात रियान परागच्या विकेटचाही समावेश होता. राजस्थानच्या डावातील १४ वे षटक हर्षल पटेलने टाकले. त्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रियान परागने चौकार ठोकला. मात्र पुढच्याच चेंडूवर हर्षल पटेलने त्याला युझवेंद्र चहलकडे झेल देण्यास भाग पाडत बाद केले. त्यानंतर हर्षल पटेलला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने तोंडातून काहीतरी पुटपुटत रियान परागला डगआऊटमध्ये जाण्याचा इशारा केला. त्यानंतर या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या लढतीत देवदत्त पडिक्कल (नाबाद १०१) आणि विराट कोहली (नाबाद ७२) यांनी केलेल्या अभेद्य १८१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दवा विकेट्स राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ९ बाद १७७ धावा फटकावल्या होत्या. बंगळुरूने हे आव्हान केवळ १६.३ षटकांमध्येच पार केले. यंदाच्या हंगामातील आरसीबीचा हा चार सामन्यांमधील सलग चौथा विजय ठरला आहे. त्याबरोबरच आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला चार सामन्यांमधून तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.