चेन्नई : रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या जलदगती गोलंदाज हर्षल पटेल याने आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात शानदार कामगिरी केली. पण त्यानं केलेलं एक वक्तव्य सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. २०१८ मध्ये आयपीएल संघांनी दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे तेव्हा तो मला अपमान वाटला होता. मात्र तेव्हा फलंदाजीवर काम केलं आणि आता स्वत:ला प्रेरीत करून प्रभावी अष्टपैलू होऊ शकलो, असं हर्षल पटेल म्हणाला.
३० वर्षीय हर्ष पटेल याला २०१८ मध्ये दिल्लीनं आयपीएल लिलावात २० लाख रुपयांत विकत घेतलं होतं. मात्र त्याला संधीच मिळाली नाही. "संघात संधी न मिळाल्याने मी निराश झालो होतो. हा माझा अपमानच होता. मात्र त्यावेळी मला असा खेळाडू बनयाचं होतं. जो मॅचविनर आहे आणि त्याला खूप मागणी येईल", असं हर्षलनं पत्रकार परिषदेत सांगितलं.
"मी त्यानंतर फलंदाजीवर काम केलं. त्यामुळे मी प्रभावी खेळाडू बनु शकतो. त्यावर जास्त लक्ष दिले", असंही तो पुढे म्हणाला. पटेलच्या डेथ ओव्हर्समधील शानदार गोलंदाजीमुळेच आरसीबीला मुंबईवर पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला.
"आयपीएलमध्ये खेळासोबत चिंतेचा सामना करावा लागला एका सामन्यातील खराब खेळानंतर तुम्हाला संघाबाहेर केले जाऊ शकते. या सत्रात काही असे खेळाडू आहेत. त्यांनी चांगला खेळ केला आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटखेळायचा अनुभव नाही. मात्र त्यामुळेच आता संघ व्यवस्थापनाचा दृष्टीकोन बदलत आहे", असं हर्षल पटेल म्हणाला.
पटेल दिल्ली कॅपिटल्समधून बंगळुरुच्या संघात आला आहे. मात्र कर्णधार कोहलीने त्याला पहिल्याच सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीची संधी दिली. त्याने संधीचे सोनं केलं त्यामुळे तो खुश आहे.
"दिल्लीनं हर्षल पटेलला करारमुक्त केलं हे बरंच झालं. दिल्लीत कागिसो रबाडा आणि नॉर्खिया असल्याने त्याला तेथे जास्त संधी मिळाली नाही. जिथं कौशल्य दाखवायला संधी आहे. तिथं खेळणं नक्कीच चांगलं आहे", असं कोहली म्हणाला.