Join us  

IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: दिल्लीच्या मार्गात केकेआरचा अडथळा, चेन्नईविरुद्धच्या फायनलपूर्वी कॅपिटल्स- नाइट रायडर्स यांच्यात आज चुरशीची लढत

IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: IPLच्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या Delhi Capitalsला बुधवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या Kolkata Knight Ridersडून कडवे आव्हान मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 12:23 PM

Open in App

शारजा : आयपीएलच्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला बुधवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ( IPL Qualifier 2) उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सकडून (DC Vs KKR) कडवे आव्हान मिळणार आहे.

दिल्ली संघ रविवारी पहिल्या मोठ्या परीक्षेत नापास झाला. त्यांना पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. ऋषभ पंतच्या संघाने केकेआरकडून पराभवाची नामुष्की पत्करल्यास त्यांची वाटचाल संपुष्टात येणार आहे. सोमवारी आरसीबीला नमविणारा केकेआर संघ दिल्लीविरुद्ध आत्मविश्वासानेच खेळेल यात शंका नाही. लय, तसेच मोठ्या सामन्यात दमदार कामगिरी या दोन गोष्टींना डोळ्यापुढे ठेवल्यास सामन्यात केकेआरचे पारडे जड वाटते. 

दिल्ली संघ स्पर्धेत सर्वात संतुलित संघांपैकी एक असून, त्यांच्याकडे भक्कम फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी आहे. दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनकडून भरीव मदत होते. शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर  यांच्यासह पंत व शिमरोन हेटमायर हे धावा काढण्यात तरबेज आहेत. धवनने यंदा ५५१ धावा केल्या.

सहकारी पृथ्वी शाॅने चेन्नईविरुद्ध प्रभावी फटकेबाजी केली होती. गोलंदाजीत कॅगिसो रबाडा, एन्रिच नोर्खिया आणि २३ गडी बाद करणारा आवेश खान यांचा मारा प्रतिस्पर्धी संघांसाठी वरचढ ठरतो. दिल्लीने केकेआरविरुद्ध साखळी सामना गमावला होता. प्ले ऑफमध्ये या पराभवाचा वचपा काढण्याची संधी असेल.  दिल्ली संघात उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असून, अखेरपर्यंत योगदान देण्यात त्यांचा हातखंडा आहे. साखळीत दहा  सामने जिंकून अव्वल स्थान पटकाविणाऱ्या दिल्लीला केकेआरविरुद्ध विजय सोपा नसल्याची जाणिव आहेच. 

- ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग कोच बनल्यापासून संघ बलाढ्य झाला आहे. २०१९ ला दिल्लीने तिसरे व मागच्या सत्रात दुसरे स्थान पटकविले होते. यंदा एक पाऊल पुढे टाकून जेतेपदाची माळ गळ्यात टाकून घेण्यास खेळाडू इच्छुक असतील.- इयोन मोर्गनच्या संघाने यूएईत सर्वच सामन्यात प्रभावी कामगिरी केली. आरसीबीला नमविणारी कामगिरी पाहिल्यास केकेआरला नमविणे दिल्लीसाठी सोपे नाही. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन ही जोडी दिल्लीसाठी डोकेदुखी ठरू शकेल. - शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी यंदा धावा काढल्या, पण केकेआरला फायनलची दारे उघडी करायची झाल्यास कर्णधार मोर्गनकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. सामन्यातील विजयी संघ शुक्रवारी चेन्नईविरुद्ध फायनल खेळणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App