नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग-२०२१च्या उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन यूएईतील दुबई, अबुधाबी आणि शारजा मैदानांंवर १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होईल. कडक उन्हामुळे डबल हेडरची (एका दिवसात दोन सामने) संख्या कमी करण्यासाठी आधी १० ऑक्टोबरला होणारा अंतिम सामना १५ ला खेळविण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सामने संपविले जातील. सुरुवातीला बीसीसीआयचा दहा ‘डबल हेडर’ खेळविण्याचा विचार होता, तथापि सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात दुपारी दहा सामने खेळविणे खेळाडूंसाठी थकविणारे ठरतील. त्यासाठीच १५ ऑक्टोबर हा दिवस निवडण्यात आला.
या दिवशी अंतिम सामना झाल्यास यूएईत सुट्टी असेल, तर भारतात आठवड्याचा अखेरचा दिवस. या दिवशी सायंकाळी प्रत्यक्ष मैदानावर येणाऱ्यांची आणि टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांची संख्या नेहमीच्या तुलनेत अधिक राहील. यामुळे दोन उद्देश साध्य होणार आहेत. शिवाय ‘डबल हेडर’ची संख्या घटून पाच किंवा सहा राहील.’
१५ सप्टेंबरला भारतीय खेळाडूंचे आगमनभारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात अखेरचा कसोटी सामना मॅनचेस्टरमध्ये खेळणार आहे. पाच दिवस सामना चालला तर तो १४ सप्टेंबर रोजी संपेल. दुसऱ्या दिवशी खेळाडू चार्टर्ड विमानाने मॅनचेस्टरहून दुबईत दाखल होतील. भारतीय खेळाडूंना यूएईत तीन दिवस कठोर क्वारंटाईन व्हावे लागेल. तथापि ब्रिटनमधील बायोबबलमधून हे खेळाडू येणार असल्याने यूएईतील कोरोना नियमातून सूट मिळण्याची शक्यता आहे.
पदाधिकाऱ्यांनी यूएईत ठोकला तळ- सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, काळजीवाहू सीईओ हेमांग अमिन, कोषाध्यक्ष अरुण धुमल, संयुक्त सचिव जयेश जॉर्ज आणि आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल हे आयोजनाला मूर्त स्वरूप देण्यासाठी यूएईत आहेत. - अमिरात क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठक आणि मैदानांचे निरीक्षण केल्यानंतर जय शाह भारतात परतले.