नवी दिल्ली : आयपीएल आटोपल्यानंतर विनाअडथळा मायदेशी सुरक्षित परत पाठविण्याची जबाबदारी आमचीच असेल. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये खेळत असलेल्या विदेशी खेळाडूंना मंगळवारी दिले. भारतात कोरोनाचा प्रकोप वाढताच ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी मायदेशी प्रस्थान केल्यामुळे बीसीसीआयला हे आश्वासन देणे भाग पडले.
राजस्थान संघातील ॲन्ड्रयू टाय, आरसीबीचे ॲडम झम्पा आणि केन रिचडर्सन यांनी माघार घेताच बीसीसीआय सीईओ हेमांग अमीन यांनी खेळाडूंना पत्राद्वारे आश्वासन दिले. अमीन म्हणाले, ‘तुमच्यापैकी अनेकांना आयपीएल संपल्यानंतर घरी सुरक्षित परतण्याची चिंता असल्याची आम्हाला जाणीव आहे. चिंता करू नका. कुठल्याही अडथळ्याविना तुमच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहेत. सर्व परिस्थितीवर लक्ष असून तुम्हाला मायदेशी पोहोचविण्यासाठी बोर्ड अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तुम्ही घरी पोहोचेपर्यंत बीसीसीआयसाठी आयपीएलची सांगता झालेली नसेल.’ ऑस्ट्रेलियाने भारतातून थेट येणाऱ्या विमानांवर १५ मे पर्यंत तत्काळ प्रभावाने बंदी घातली. यामुळे केकेआर संघाचे मेंटॉर डेव्हिड हसी यांनी ऑस्ट्रेलियातील स्थिती पाहता मायदेशी परतण्याबाबत नर्व्हस असल्याची चिंता व्यक्त केली होती.
अमीन यांनी आयपीएलमध्ये कायम राहण्याचा निर्णय घेणाऱ्या विदेशी खेळाडूंचे कौतुुक करीत, ‘तुम्ही मैदानात खेळता तेव्हा लाखो लोकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविता. आपण व्यावसायिक खेळाडू आहात, विजयासाठीच खेळता, मात्र यावेळी महत्त्वपूर्ण काम करीत आहात,’ या शब्दात खेळाडूंचा उत्साह वाढविला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडचे अनेक खेळाडू लीगमध्ये खेळत असले तरी त्यांनी कुठलीही चिंता व्यक्त केली नाही, हे विशेष. आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबाद येथे ३० मे रोजी खेळला जाईल.
खेळाडूंची स्वत:ची जबाबदारीआयपीएलमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्वत:च्या जबाबदारीवर मायदेशी परत यावे, असे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी म्हटले आहे. ‘आमचे खेळाडू अधिकृत दौऱ्यावर नव्हे तर खासगी प्रवासावर गेले. ते स्वत:च्या खर्चाने मायदेशी परत येतील, असा विश्वास पंतप्रधानांनी ‘द गार्डियन’शी बोलताना व्यक्त केला.
ख्रिस लीनची मागणीमुंबई इंडियन्सचा फलंदाज ख्रिस लीन याने आयपीएल आटोपताच घरी परतण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची मागणी ऑस्ट्रेलिया सरकारकडे केली होती.ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू आयपीएलमध्ये आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्य कोच रिकी पॉंटिंग आणि सायमन कॅटिच, समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकेल स्लेटर आणि लीझा स्थळेकर हे देखील येथे आहेत. सीए आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स संघटनादेखील आपल्या खेळाडूंच्या संपर्कात आहे.
स्मिथ, वॉर्नर मायदेशी परतणार?आंतरराष्ट्रीय सीमा बंद होण्याआधी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर आयपीएल सोडून ऑस्ट्रेलियात परत जाण्याच्या विचारात आहेत.ऑस्ट्रेलियातील माध्यमांनुसार ‘वॉर्नर आणि स्मिथसह सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सीमा बंद होण्यापूर्वी परत येऊ शकतात,’ अशी माहिती आयएनएसने दिली आहे.