चेन्नई : मुंबई इंडियन्स संघ इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी येथे नवव्यांदा आपली सलामी लढत जिंकण्यात अपयशी ठरला, पण कर्णधार रोहित शर्मा मात्र निराश झालेला नाही. कारण त्याच्या मते पाचवेळच्या चॅम्पियन संघासाठी पहिली लढत नव्हे तर चॅम्पियनशिप जिंकणे महत्त्वाचे आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएल-१४ च्या सलामी लढतीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (आरसीबी) दोन विकेटने पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५९ धावा केल्या. आरसीबीने अखेरच्या चेंडूवर लक्ष्य गाठले.
सामन्यानंतर रोहित म्हणाला,‘पहिली लढत नव्हे चॅम्पियनशिप जिंकणे महत्त्वाचे आहे. चांगली लढत झाली. आम्ही त्यांना सहज जिंकू दिले नाही. आम्ही आपल्या धावसंख्येवर खूश नव्हतो. आम्ही २० धावा कमी केल्या. आम्ही काही चुका केल्या, पण असे घडत असते. ते विसरून आम्हाला आगेकूच करावी लागेल. खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. आम्हाला आगामी काही लढतींमध्ये याबाबत विचार करावा लागेल.’ आरसीबीचा कर्णधार विराट कोहली म्हणाला,‘विजयाने सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. आमच्याकडे अनेक पर्याय असल्यामुळे आम्ही सामन्यात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो. गेल्यावेळीही आम्ही पहिली लढत जिंकली होती. आपल्या संघाची ताकद जाणून घेण्यासाठी मजबूत संघाविरुद्ध खेळणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपले योगदान दिले. पहिल्या डावात खेळपट्टी चांगली भासत होती, पण त्यानंतर चेंडू थांबून येत होता. त्यामुळे भागीदारी महत्त्वाची होती. या मैदानावर मनाप्रमाणे फटकेबाजी करता येत नाही.
डिव्हिलयर्स एकमेव असा फलंदाज आहे की जो संथ खेळपट्टीवर कमाल करू शकतो.’
कोहलीने हर्षल पटेलची प्रशंसा केली. त्याने डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करताना २७ धावांत ५ बळी घेतले. पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
कोहली म्हणाला,‘आम्ही अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. हर्षलची गोलंदाजी महत्त्वाची होती. तो डेथ ओव्हर्समध्ये आमचा गोलंदाज राहील. त्याने आपल्या प्रयत्नाने बळी घेतले.’
Web Title: IPL 2021: It's important to win the tournament, not the first match - Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.