IPL 2021, KKR: कोलकाता नाइट रायडर्स संघाचा युवा फलंदाज व्यंकटेश अय्यर यानं एक मोठा खुलासा केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडे पाहूनच क्रिकेटमध्ये आल्याचं व्यंकटेशनं म्हटलं आहे. गांगुलीसाठीच मला कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात खेळायचं होतं, असं व्यंकटेश म्हणाला.
आयपीएलच्या १४ व्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाताच्या संघाला नवा हिरो सापडला आहे. संघानं व्यंकटेश अय्यर या युवा डावखुऱ्या फलंदाजाला संघात संधी दिली आणि त्यानं संधीचं सोनं केलं. आरसीबी विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात नाबाद ४१ धावांची खेळी साकारली. तर मुंबई इंडियन्सविरुद्ध व्यंकटेशनं इतिहास रचला. व्यंकटेशनं मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपलं आयपीएलमधलं पहिलंवहिलं अर्धशतक अवघ्या २५ चेंडूत पूर्ण केलं. व्यंकटेशनं ३० चेंडूत ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली आणि संघाला सलग दुसरा विजय प्राप्त करुन दिला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयानंतर व्यंकटेशनं त्याचा क्रिकेटमधील आदर्श कोण याबाबत सविस्तर माहिती दिली.
मान गये अय्यर...KKR च्या व्यंकटेश अय्यरचं IPL मधलं पहिलंवहिलं अर्धशतक, तेही अवघ्या २५ चेंडूत!
आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा सौरव गांगुली कोलकाता नाइट रायडर्स संघाचं नेतृत्व करत होता. याच काळात व्यंकटेश गांगुलीच्या फलंदाजीनं प्रभावित झाला होता. तो म्हणाला, "खरं सांगू तर मला सुरुवातीपासूनच केकेआरसाठी खेळायचं होतं. सौरव गांगुली हेच यामागचं कारण होतं. जेव्हा माझी निवड केकेआरमध्ये झाली तेव्हा माझं स्वप्नच पूर्ण झालं होतं. केकेआरमध्ये माझं मोठ्या आनंदात स्वागत झालं"
'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या...
सौरव गांगुलीमुळेच डावखुरा फलंदाज झालोव्यंकटेश अय्यरनं यावेळी गांगुलीचं कौतुक केलं आणि तोच आपलं प्रेरणास्थान असल्याचं म्हटलं. "मी दादाचा खूप मोठा फॅन आहे. संपूर्ण जगात त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत आणि त्यापैकी मी एक आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा उजव्या हातानं फलंदाजी करायचो. पण मला सौवर गांगुली सारखं व्हायचं होतं. ज्यापद्धतीनं ते षटकार ठोकायचे. तसेच षटकार मला लगावण्याची आवड निर्माण झाली होती. त्यामुळेच मी डावखुरा फलंदाज झालो. त्यांचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव राहिला आहे आणि त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे", असं व्यंकटेश अय्यर म्हणाला.