IPL 2021, KKR vs DC, Live Updates: दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाइट रायडर्ससमोर विजयासाठी १२८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. शारजाचं मैदान छोटं असल्यानं इथं चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. पण आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून एकाही फलंदाजाला षटकार ठोकता आलेला नाही. खेळपट्टीवर चेंडू थांबून येत असल्याचं दिसून आलं आहे. वीस षटकांच्या अखेरीस दिल्ली कॅपिटल्सला ९ बाद १२७ धावा करता आल्या. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतनं सर्वाधिक ३९ धावांचं योगदान दिलं. तर आज पृथ्वी शॉच्या जागी संधी देण्यात आलेल्या स्टीव्ह स्मिथनंही ३९ धावांचं योगदान दिलं. कोलकाताकडून लॉकी फर्ग्युसन, सुनील नरेन आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर टीम साऊदीनं एका फलंदाजाला बाद केलं.
दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली होती. स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन यांनी सलामीसाठी ३५ धावांची भागीदारी रचली. धवन २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर अवघी एक धाव काढून माघारी परतला. सुनील नरेन यानं अय्यरला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर ऋषभ पंतनं मैदानात जम बसवून डाव सावरला. अखेरच्या षटकांमध्ये ऋषभनं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात काही यश येताना दिसलं नाही. खेळपट्टीवर चेंडू थांबून येत असल्याचा फायदा घेत कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात मारा करत दिल्लीवर अंकुश ठेवला. दिल्लीकडून ललित यादव, अक्षर पटेल यांना तर खातंही उघडता आलं नाही. शिमरेन हेटमायर ४ धावा, तर रविचंद्रन अश्विन ९ धावा करुन बाद झाले.