IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates : दिल्ली कॅपिटल्स ( DC) व कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांच्यापैकी आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यात कोणता संघ दाखल होईल, याचा फैसला आज होणार आहे. कोलकाताच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल करताना दिल्लीच्या धावगतीवर लगाम लावली. श्रेयस अय्यर व रिषभ पंत याच्या आधी मार्कस स्टॉयनिसला फलंदाजीला पाठवण्याचा DCचा निर्णय फसला. स्टॉयनिस काही कमाल करू शकला नाहीच, पण धावा कमी होण्याच्या दडपणाखाली अय्यर, रिषभ, शिमरोन हेटमायर हेही अपयशी ठरले.
कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आजही आंद्रे रसेलला बाकावर बसवणं महत्त्वाचं समजलं. दिल्लीनं संघात एक बदल करताना टॉम कुरनच्या जागी मार्कस स्टॉयनिसला संधी दिलीय. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिली दोन षटकं सावधपणे खेळून काढली, पण तिसऱ्याच षटकात पृथ्वीनं खणखणीत षटकार खेचून चेंडू स्टेडियमबाहेर फेकला. त्या षटकात १२ धावा जोडल्यानंतर शिखऱ धवननं KKRचा स्टार गोलंदाज सुनील नरीन याची धुलाई केली. सलग दोन षटकार खेचून त्या षटकात १४ धावा जोडल्या. पण, वरुण चक्रवर्थीनं KKRला यश मिळवून देताना पृथ्वीला ( १८) पायचीत पकडले. पृथ्वीच्या विकेटनंतर दिल्लीची धावसंख्या मंदावली, KKRच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. साकिबच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकनं DCच्या गब्बरला यष्टिचीत करण्याची संधी गमावली. दिल्लीनं ७ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या.
दिल्लीनं विकेट तर टिकवली, परंतु त्यांच्या धावांचा ओघ आटला होता. पुन्हा एकदा KKRचे फिरकीपटू वरचढ होताना दिसले. म्हणूनच DC कर्णधार रिषभ पंत व प्रशिक्षक रिकी पाँटिंग हे डगआऊटमध्ये बसून रणनीती तयार करताना दिसले. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या टॉम कुरनला बाकावर बसवून संघात परतलेल्या मार्कस स्टॉयनिसनं दुसऱ्या विकेटसाठी गब्बरसह सावध भागीदारी केली, परंतु शिवम मावीनं त्याचा ( १८) त्रिफळा उडवला. धवन खेळपट्टीवर होता, परंतु त्याच्याकडून धावा होताना दिसत नव्हत्या. त्यामुळे श्रेयस अय्यरवर दडपण निर्माण होत होते. १५व्या षटकात शिखर धवन ( ३६) धावांवर चक्रवरर्थीच्या गोलंदाजीवर बाद झाला. रिषभ पंत आला अन् लगेच माघारी फिरलाही. दिल्लीनं १५ षटकांत ४ बाद ९० धावा केल्या होत्या. शाकिबनं ४ षटकांत २८ धावा दिल्या.
शिमरोन हेटमायरनं ( ३) टोलवलेला चेंडू शुबमन गिलनं अफलातून रितीनं टिपला, परंतु चक्रवर्थीनं टाकलेला तो चेंडू नो बॉल असल्यानं त्याला जीवदान मिळाले. चक्रवर्थीनं ४ षटकांत २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. हेयमायर जीवदान मिळूनही केवळ १४ धावा जोडून धावबाद झाला. दिल्लीला २० षटकांत कशाबशा ५ बाद १३५ धावाच करता आल्या. सुनील नरीननं ४ षटकांत २७ धावा दिल्या, तर ल्युकी फर्ग्युसननं २६ धावांत १ विकेट घेतली. अय्यर ३० धावांवर नाबाद राहिला.
Web Title: IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates: Kolkata Knight Riders need 136 runs to qualify into the final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.