IPL 2021, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Qualifier 2 Live Updates : कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला क्वालिफायर २ चा सामना चुरशीचा झाला. दिल्लीनं ५ बाद १३५ धावा करूनही कोलकाताला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. बिनबाद ९६ वरून कोलकाताचा डाव ७ बाद १३० असा गडगडला. कागिसो रबाडा, अॅनरीच नॉर्ट्जे व आर अश्विन यांनी अनुक्रमे १८, १९ व २० वे षटक अप्रतिम फेकले, परंतु राहुल त्रिपाठीच्या एका खणखणीत फटक्यानं दिल्लीच्या स्वप्नांचा चुराडा केला. आर अश्विनच्या हॅटट्रिक चेंडूवर त्रिपाठीनं सरळ षटकार खेचून कोलकाताला IPL 2021 Final मध्ये प्रवेश मिळवून दिला. आता त्यांच्यासमोर चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK vs KKR Final) यांचे आव्हान असणार आहे. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याला भावना आवरता आल्या नाही.
सामन्यानंतर तो म्हणाला, एकदा मॅच संपल्यानंतर काहीच बदलू शकत नाही. आम्ही नेहमी स्वतःवर विश्वास ठेऊन खेळ केला आणि सामन्यात जेवढं शक्य होईल, तेवढे प्रयत्न केले. गोलंदाजांनी सामना फिरवलाच होता. कोलकाताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या टिच्चून माऱ्यासमोर आम्ही स्ट्राईकही रोटेट करू शकलो नाही. पुढील पर्वाय आणखी दमदार कामगिरी करू, अशी आशा व्यक्त करतो. या संपूर्ण पर्वात आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही एकजुटीनं राहिलो आणि एकमेकांची काळजी घेतली.''
वेंकटेश व शुबमन यांनी उभारला मजबूत पाया पण...वेंकटेश अय्यर व शुबमन गिल यांनी KKRला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावा जोडून कोलकाताच्या विजयाची औपचारिकता अन्य फलंदाजांच्या खांद्यावर सोडली होती. वेंकटेश ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावंवर झेलबाद झाला. गिल ४६ धावांवर झेलबाद झाला. १८ चेंडूंत ११ धावांची गरज असताना कागिसो रबाडानं १८व्या षटकात केवळ १ धाव देत दिनेश कार्तिकचा ( ०) त्रिफळा उडवला. नॉर्ट्जेनं १९व्या षटकात फक्त ३ धावा देत, इयॉन मॉर्गनचा त्रिफळा उडवला. रिषभनं अखेरचं षटक अनुभवी आर अश्विनच्या हाती सोपवला अन् त्यानं सलग दोन चेंडूंत शाकिब अल हसन व सुनील नरीन यांची विकेट घेतली. पण, राहुल त्रिपाठीनं खणखणीत षटकार मारून कोलकाताचा विजय पक्का केला. कोलकातानं हा सामना ३ विकेट्स राखून जिंकला.