IPL 2021, KKR vs PBKS, Live: पंजाब किंग्जचा सामना म्हटलं की अखेरच्या षटकापर्यंत रंगतो आणि ऐनवेळी संघ माती करुन हातचा सामना गमावतो असं अनेकदा पाहायला मिळतं. पंजाबचा आजचा सामना देखील अखेरच्या षटकापर्यंत रंगला पण यावेळी कर्णधार केएल राहुलच्या कर्णधारी खेळीमुळं पंजाबच्या खात्यात विजयश्रीची नोंद झाली आहे. कोलकाता नाइट रायडर्सनं दिलेलं १६६ धावांचं आव्हान पंजाब किंग्जनं ५ विकेट्स राखून गाठलं. सामन्यात दमदार कामगिरी करुनही हातचा सामना गमावण्याची पंजाबची जुनीच सवय आहे. पण या सामन्यात कर्णधार केएल राहुल यानं अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. अखेरच्या षटकात विजयासाठी चार धावांची गरज असताना केएल राहुलनं मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट गमावली आणि पुन्हा एकदा पंजाबच्या डगआऊटमध्ये चिंतेचे ढग पसरलेले पाहायला मिळाले. पुढच्याच चेंडूवर शाहरुख खान यानं षटकार ठोकत पंजाबच्या विजावर शिक्कामोर्तब केलं आणि दोन गुणांची कमाई करून दिली.
पंजाबच्या संघानं याच मैदानात राजस्थान विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात ४ धावांची गरज असताना सामना गमावला होता. पण त्या चुकीची पुनरावृत्ती आजच्या सामन्यात झाली नाही. दरम्यान, सामन्याच्या १९ व्या षटकात केएल राहुल याचा राहुल त्रिपाठीनं टिपलेला झेल वादग्रस्त ठरला. राहुल त्रिपाठीनं टिपलेला झेल पूर्ण झालेला नसून चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याचा निकाल तिसऱ्या पंचांनी दिला आणि केएल राहुल याला जीवनदान मिळालं होतं.
कोलकातानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जकडून केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात करुन दिली होती. दोघांनी सलामीसाठी ७० धावांची भागीदारी रचली. मयांक अग्रवाल २७ चेंडूत ४० धावा करुन बाद झाला. केएल राहुलनं दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत ठेवली. पण त्याला अपेक्षित साथ मिळत नव्हती. निकोल पुरन (१२), मार्करम (१८), दिपक हुडा (३) अशा ठराविक अंतरानं विकेट्स जात राहिल्या. अखेरीस आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या शाहरुख खाननं मिळालेल्या संधीचं सोनं करत केएल राहुलला चांगली साथ दिली. शाहरुख खाननं ९ चेंडूत २ षटकार आणि एक चौकार ठोकत नाबाद २२ धावांची खेळी साकारली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीनं दोन, तर शिवम मावी, सुनील नारायण आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.